नाना पटोले यांची घरवापसी, आशीष देशमुखांचे एक पाऊल पुढे!

18

सामना ऑनलाईन । मुंबई

पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका करून खासदारकी व भाजप सदस्यत्वाचा राजीनामा देणाऱ्या नाना पटोले यांनी अपेक्षेप्रमाणे काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांची घरवापसी झाल्याची अधिकृत घोषणा आज करण्यात आली तर दुसरीकडे बंडाचे निशाण फडकावून पक्षाला आव्हान देणाऱ्या भाजप आमदार आशीष देशमुख यांनी आज आपल्या टीकेची धार वाढवत एक पाऊल पुढे टाकले आहे.

सर्वसाधारणपणे राजकारणातील मंडळींचा सत्तेकडे ओढा असतो. केंद्रात व राज्यात सत्तेत असलेल्या भाजपात इनकमिंग सुरू असताना भंडाऱ्याचे खासदार नाना पटोले यांनी बंडाचे निशाण उभारले होते. अखेर डिसेंबरमध्ये त्यांनी भाजप सदस्यत्वाचा व खासदारकीचा राजीनामा दिला होता. भाजपला रामराम केल्यानंतर नाना पटोले यांनी ४ जानेवारीलाच काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता, पण याबाबतची अधिकृत घोषणा आज करण्यात आली. काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून नाना पटोलेंच्या पक्ष प्रवेशाची माहिती देण्यात आली आहे. मागच्या आठवड्यात त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची त्यांनी दिल्लीत भेट घेतली. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम आदी नेते यावेळी उपस्थित होते.

ग्रामीण जनता सरकारवर नाराज!
नाना पटोले यांच्यापाठोपाठ विदर्भातील भाजप आमदार आशीष देशमुख यांनी स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा उपस्थित करत वेगळी वाट पत्करली आहे. स्वतंत्र विदर्भ व विदर्भाच्या विकासाचा मुद्दा घेऊन विदर्भातील ६२ मतदारसंघांत आत्मबळ यात्रा काढण्याची घोषणा भाजप आमदार आशीष देशमुख यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत केली. निवडणुकीतही स्वतंत्र विदर्भाची घोषणा भाजपकडून करण्यात आली होती, पण सत्ता आल्यावर हा विषय मागे पडल्याने त्याची आठवण करून देण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांना हिवाळी अधिवेशनाच्या काळात पत्र पाठवले होते, परंतु अद्याप त्यावर कोणतेही उत्तर आले नसल्याचे देशमुख यांनी सांगितले.आत्मबळ यात्रेच्या निमित्ताने विदर्भातील ६२ मतदारसंघांत पोहोचणार आहे, असे त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या