राज्यातील हजारो सरपंचांनी त्यांच्या विविध मागण्यासाठी आझाद मैदानात आंदोलन सुरु केले असून त्यांचा मागण्या रास्त आहेत. भाजप महायुती सरकार त्यांच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करत आहे, त्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचण्याचे काम करु आणि महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर त्यांच्या सर्व प्रलंबित मागण्या मान्य करु, अशी ग्वाही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
आझाद मैदानातील अखिल भारतीय सरपंच परिषद, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी संगणक परिचालक, ग्रामरोजगार सेवक यांच्या आंदोलनास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भेट दिली. यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले की, संगणक परिचालकांच्या प्रश्नी भाजपा युती सरकारची भूमिका संशयास्पद आहे, संगणक परिचालकांच्या मानधनातही भ्रष्टाचार शिरला आहे. संगणक परिचालकांची नेमणूक व मानधनाचा मुद्दा निकाली निघाला पाहिजे. ते अत्यंत कमी पैशात काम करतात. आता या अनुभवी संगणक परिचालकांना काढून दुसऱ्याची नेमणूक करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पैशाचा अधिकार ग्रामपंचायतीचा आहे पण सरकार पैसे देत नाही. महायुती सरकार हे आता काही दिवसांचे आहे हे सरकार सत्तेतून खाली खेचा महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर तुम्हाला न्याय देऊ, असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.