तांबे कुटुंबातील वादाचा काँग्रेसशी संबंध नाही – नाना पटोले

नाशिक पदवीधर मतदारसंघात एकत्रितपणे चर्चा करूनच डॉ. सुधीर तांबे यांची उमेदवारी निश्चित केली होती. त्यांच्या कुटुंबातील वादात आम्ही पडत नसून, काँग्रेसला बदनाम करण्याचा प्रकार कदापि खपवून घेणार नाही, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे. दरम्यान, विधानसभेच्या पुण्यातील दोन्ही जागा महाविकास आघाडीच लढणार असून, यासाठी 2 फेब्रुवारीला बैठक होणार असल्याचेही ते म्हणाले.

नगरच्या पदवीधर मतदारसंघाच्या मेळाव्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, प्रताप ढाकणे, विनायक देशमुख, किरण काळे, अभिषेक कळमकर आदी उपस्थित होते.

नाना पटोले म्हणाले, पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारी देताना कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा झाली होती. त्यात काँग्रेसकडून डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय झाला होता. त्यासाठी त्यांना दोन कोरे ‘ए-बी’ फॉर्मही पाठवले होते. मात्र, त्यांच्या घरातील वादात आम्हाला पडायचे नव्हते. तुमच्यापैकी जो उमेदवार ठरेल, त्याचे नाव टाका, असे सांगण्यात आले होते. मी 12 जानेवारी रोजी आमदार बाळासाहेब थोरात यांच्याशी स्पष्ट बोललो आहे. कुटुंबातील वादाला पक्ष कसा जबाबदार असेल? पक्षाला वेठीस धरणाऱयांना त्यांची जागा दाखविली जाईल, असेही ते म्हणाले. आमदार बाळासाहेब थोरात हे आजारी आहेत. मात्र, ते माझ्या संपर्कात आहेत. ते पक्षाबरोबर आहेत, असे आत्तापर्यंत ते मला सांगत आहे. ते आमचे नेते आहेत, असेही नाना पटोले म्हणाले.

राज्यपालांची हकालपट्टी केली पाहिजे, ते सध्या नौटंकी करत आहेत, ही आमची भूमिका आहे. ज्यांनी महापुरुषांचा वेळोवेळी अपमान केला, अशा राज्यपालांना राज्यात राहण्याचा नैतिक अधिकार नाही. राजीनामा कोणाकडे द्यायचा असतो हे त्यांना समजत नव्हते का, असेही ते म्हणाले. राज्यात लोकसभा निवडणुकांबाबत एक नवीन सर्व्हे समोर आला आहे. आज निवडणुका लागल्या तर महाविकास आघाडीला 38 जागा मिळतील, असा दावा त्यात करण्यात आला आहे. मग आता भाजपवाल्यांची ‘नॅनो’ होणार का, असा सवालही त्यांनी केला.

बीबीसीने प्रसारित केलेल्या डॉक्युमेंटरीबाबत सरकार कोणताही निर्णय घेत नाही. ती डॉक्युमेंटरी का दाखवली जात नाही, असा सवाल करत माध्यमांवर हुकूमशाही करण्याचाच हा प्रकार आहे. या डॉक्युमेंटरीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इतिहास दाखवला आहे. त्यामुळेच ती समोर आणली जात नसल्याची शंका त्यांनी व्यक्त केली.