पाईप चोरी प्रकरणी अखेर गुन्हा दाखल, दोन आरोपींना अटक

21

सामना प्रतिनिधी । नांदेड

चोरीच्या पाईपमधून नांदेडच्या पाणी पुरवठा योजनेचे काम करणाऱ्या कंत्राटदार – सहकंत्राटदार व प्रत्यक्षात पाईप चोरणारा अशा तिघांविरुध्द इतवारा पोलिसांनी काल रात्री उशीरा गुन्हा दाखल केला असून काँग्रेसच्या दबावाखाली असलेल्या इतवारा पोलिस ठाण्याने या प्रकरणात टाळाटाळ केल्यानंतर प्रशिक्षणावरुन रुजू झालेल्या चंद्रकिशोर मीणा यांच्या झटक्याने हा गुन्हा अखेर दाखल झाला आणि दोन आरोपी शेख अब्दुल अजीज पिता शेख मुस्तफा आणि शम्स नजीर अहेमद यांना पोलिसांनी अटक केली आहे.

दै.’सामना’ने गेल्या महिनाभरापासून पाईप चोरी प्रकरणाचा पाठपुरावा केला आहे. प्रेमपत्रांची देवाण घेवाण, कंत्राटदारांना प्रेमपत्रे यामध्ये रंगलेला महापालिका, पोलीस यंत्रणा व आंध्र पोलीस यांच्यातील तिरंगी सामना अखेर चंद्रकिशोर मीणा यांच्या षटकाराने संपला. या प्रकरणात आदिलाबाद आणि मेदक जिल्ह्यात अमृत योजनेत वापरलेले पाईप चोरुन आणण्यात आले होते आणि त्यातून नांदेडच्या वार्ड क्र.१४ मधील पाणी पुरवठा योजनेचे काम करण्यात आले. महापालिकेत काँग्रेसची एकहाती सत्ता असताना चोरीच्या पाईपच्या माध्यमातून पाणी पुरवठा योजनेचे काम करण्याचा नवा फंडा शोधण्यात आला, मात्र परराज्यातील चाणाक्ष पोलिसांनी तो शोधून काढला. महापालिकेने सदर कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकले खरे मात्र गुन्हा दाखल कसा करायचा याबद्दल पोलीस ठाणे आणि महापालिकेत प्रेमपत्राची देवाण-घेवाण झाली. अर्थात इतवारा पोलिसांनी या प्रकरणात टाळाटाळ केलीच खरी, मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाली झाल्यानंतर या प्रकरणाची वाच्यता सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचली. दीड महिना प्रशिक्षणाला बाहेर असलेल्या पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांना नांदेडच्या काही सुजाण नागरिकांनी व पत्रकारांनी या प्रकरणाचे गांभिर्याने समजावून सांगितले. त्यांनी गेल्या दोन दिवसात सबंध प्रकरणाची फाईल तपासून तसेच आंध्र व तेलंगणामधील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करुन अखेर या प्रकरणात गुन्हा नोंदविला.

इतवारा पोलीस ठाण्याचे अधिकारी किशन पंडितराव सोळंके यांच्या फिर्यादीवरुन या प्रकरणात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपींना चौकशीसाठी बोलाविण्यात आले आणि लगेचच त्यांना अटक करण्याचे आदेश मीणा यांनी दिले. यातील सोहेल कन्स्ट्रक्शनचा कंत्राटदार शेख नजीर अहेमद पिता शेख हुसेन हा मात्र फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. यातील अन्य दोन आरोपी शेख अब्दुल अजीज पिता शेख मुस्तफा आणि शम्स नजीर अहेमद या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. जवळपास ११ लाख रुपयांचे चोरीचे पाईप वापरण्यात आल्याचे या फिर्यादीत म्हंटले असून, आणखी काही मोठे घबाड हाती लागण्याची शक्यता आहे. एकहाती सत्तेच्या जोरावर पारदर्शी कारभार करण्याची हमी देणाऱ्या मनपा सत्तेत चोरीच्या पाईपमधून पाणीपुरवठ्याचे काम होत असल्याचे लक्षात आल्यानंतर नागरिकांत मात्र संतापाचे वातावरण पसरले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या