नांदेड गारठले…९.८ अंश सेल्सिअस

नांदेड– यंदाच्या हंगामातील शहराचे तापमान आज पहाटे ९.८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, तर संभाजीनगर शहराचे किमान तापमान १२.८ अंश नोंदवले गेले आहे. सरते वर्ष संपत असताना व नव्या वर्षाच्या सुरुवातीला बरेच दिवस थंडीचा हा कडाका कायम राहणार असल्याची माहिती महात्मा गांधी मिशनच्या खगोलशास्त्र विभागाचे प्रमुख श्रीनिवास औंधकर यांनी दिली आहे.

सध्या ला निनाचा प्रभाव सुरू आहे व याचा परिणाम म्हणून यावर्षी उत्तर गोलार्धात हिवाळ्यातील तापमानात मोठ्या प्रमाणावर घसरण सुरू आहे. उत्तर अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, युरोप, रशिया, चीन व जपान या देशांत किमान तापमानात कमालीची घसरण दिसून येत आहे.

२० डिसेंबर २०१६ दरम्यान सहारा व अरबस्तानातील वाळवंटी प्रदेशात ३५-४० वर्षांनंतर मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाली. उत्तर हिंदुस्थानात देखील यावर्षी गारठून टाकणारी थंडी सुरू आहे. जम्मू आणि कश्मीर येथे चिलाई कलान हा अत्यंत थंडीचा कालावधी नुकताच (२१ डिसेंबरपासून ) सुरू झाला आहे व येथील दल सरोवर वेळेआधीच गोठण्यास सुरुवात झाली आहे. यंदाच्या ला निना प्रभावाने उत्तरध्रुवीय वारे हे पृष्ठभागावरून ३-४ कि.मी. उंचीवरून अत्यंत तीव्रतेने पश्‍चिमेकड़ून पूर्वेकडे वाहताना दक्षिणेकडे सरकलेले दिसून आले आहेत. त्यामुळे हिंदुस्थानात कश्मीर, पंजाब, राजस्थान येथून दाखल होणारे अतिथंड वारे गुजरात / महाराष्ट्रात दाखल होत आहेत.

गेल्या ४-५ दिवसांपासून किमान तापमान १०.१ अंश सेल्सिअसच्या दरम्यान असलेले तापमान आज २८ डिसेंबर रोजी नांदेड शहर परिसरात पहाटे ४.१२ वाजता ९.८ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदले गेले, तर संभाजीनगर शहराचे किमान तापमान १२.८ अंश नोंदवले गेले आहे. या वर्ष अखेरीस उत्तरध्रुवीय वारे हे अत्यंत तीव्रतेने पश्‍चिमेकड़ून पूर्वेकडे वाहतील, असे दिसत आहे. यावेळेस तापमानात कमालीची घट होणार असून नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात या थंडीच्या तीव्रतेत मोठ्या प्रमाणात वाढ अपेक्षित आहे व या किमान तापमानात कमालीची घट होणार आहे. नांदेड परिसरात हे किमान तापमान ७.० अंश सेल्सिअसच्याही खाली जाण्याची शक्यता आहे.