नांदेड-दिल्ली-अमृतसर विमानसेवेला लवकरच होणार  सुरवात- खा.हेमंत पाटील 

76

सामना प्रतिनिधी । नांदेड

नांदेडहुन दिल्ली-अमृतसर ही  आठवड्यातून तीन दिवस असणारी विमानसेवा आता नांदेड वरून लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे नांदेडहुन दिल्ली, अमृतसर  कडे जाणाऱ्या शीख भाविकांची, प्रवाशांची गैरसोय होणार नाही. याबाबत नुकतेच  खासदार हेमंत पाटील यांनी केंद्रीय नगर विकास नागरी हवाई उड्डाण राज्यमंत्री हरदीप सिंग पुरी यांची भेट घेऊन ही मागणी केली.

नांदेड ची ओळख देशाच्या नकाशावर  धार्मिक दृष्ट्या खूप महत्वाची आहे. गुरु गोविंद सिंग यांची पावन पवित्र भूमी ‘तख्त सचखंड श्री हुजूर अबचल नगर साहिब’ नावे प्रसिद्ध असून दररोज हजारो शीख बांधव रेल्वे, विमानाने ये-जा करतात. तसेच देशाच्या राजधानीत जाण्यासाठी विदर्भातून नागपूर व आंध्रप्रदेशातील  हैद्राबाद शिवाय पर्याय नसल्याने भाविकांची  गैरसोय होत आहे. सध्या नांदेडचे विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सेवा पुरवीत असून, आठवड्यातून फक्त तीनच  दिवस

नांदेड-दिल्ली- अमृतसर विमान सेवा चालू होती. यामुळे  दररोज ये-जा करणाऱ्या देश विदेशातील भाविकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेता खासदार हेमंत पाटील यांनी नुकतीच दिल्ली येथे केंद्रीय गृहनिर्माण आणि नगर विकास नागरी हवाई उड्डाण राज्यमंत्री हरदीप सिंग पुरी यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या समवेत खा. डॉ. प्रीतम मुंडे, खा. डॉ. भारती पवार, खा.धैर्यशील माने यांची उपस्थिती होती. लवकरच नांदेड-दिल्ली-अमृतसर ही दररोज विमानसेवा सुरू होईल.

खासदार हेमंत पाटील यांनी यासोबत आणखी काही मागण्या प्रामुख्याने मांडल्या आहेत त्यामध्ये  नांदेड – पुणे -मुंबई  व मुंबई-पुणे-नांदेड, या  विमानसेवा  सुरू कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच मुंबई व हैद्राबाद येथे जास्तीच्या विमानांची वर्दळ असल्यामुळे येथे विमान पार्किंग साठी जो दर आकारला जातो तो जास्तीचा आहे. तो कमी करण्याच्या उद्देशाने  नांदेड एअरपोर्ट ला ‘पार्किंग हब’ उभारावा जेणेकरून नांदेड विमानतळ इतर शहरांशी जोडल्या जाईल अशीही मागणी करण्यात आली. यावरही मंत्री महोदयांनी लवकरच निर्णय घेतला जाईल असे सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या