सरकारकडून दहा हजार शेतकऱ्यांची क्रूर थट्टा

18

सामना प्रतिनिधी । नांदेड

एकीकडे शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी वेगवेगळ्या घोषणा देवून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकार तत्पर असल्याचा दावा करणाऱ्या राज्य सरकारने नांदेड जिल्ह्यातील दहा हजार शेतकऱ्यांना केवळ कागदोपत्री वीज कनेक्शन देवून त्यांची क्रूर थट्टा केली आहे. कहर म्हणजे त्यांना वीज बिले देण्याचा प्रकार उघडकीस आला असून यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.

कृषी पंपांना वीज देण्यासंदर्भात राज्य सरकारने दिलेल्या आदेशाला केवळ कागदोपत्रांची जुळवाजुळव करुन नांदेड जिल्ह्यात दहा हजार शेतकऱ्यांना केवळ नावाला वीज कनेक्शन दिल्याची माहिती उघडकीस आली आहे. जिल्ह्याच्या नरंगल ता. देगलूर युनिटमधील १९४ शेतकऱ्यांना महावितरण कंपनीच्या वतीने वीज देण्यासंदर्भात कोटेशन भरुन देण्यात आले. गेल्या तीन वर्षात या भागातील १९४ शेतकऱ्यांना असे कनेक्शन मिळाल्याचे कागदोपत्री दाखविले. यांच्याकडून वीज कनेक्शनपोटी कुणाकडून ५ हजार ५५०, कुणाकडून ६ हजार ६६० अशा रक्कमा भरुन घेण्यात आल्या. मात्र प्रत्यक्षात यांच्या शेतावर ना विजेचे खांब, ना विजेचे कनेक्शन किंवा विजेचा पुरवठा करण्यात आला नसल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे या सर्व शेतकऱ्यांना विजेचे बिल देण्यात आले आहेत.

उदाहरण घ्यायचे झाल्यास संग्राम हानमंता पाटील, राजेंद्र यादवराव बावसमान, विजयकुमार हानमंता, महादाबाई मठपती या शेतकऱ्यांना २२ हजार ३६० रुपये एवढे बिल प्राप्त झाले असून त्यांची देयके त्यांना सोपविण्यात आली आहेत. याबाबत संग्राम हानमंतराव पाटील यांनी सामनाशी बोलताना सांगितले की, सदरचे बिल आल्यानंतर आम्ही थक्क झालो असून, २०१४ साली आम्ही वीज कनेक्शनच्या मागणीसाठी ५ हजार ५५० रुपयांचे कोटेशन भरुन विजेची मागणी केली होती. यासोबतच या सर्कलमधील अन्य शेतकऱ्यांची आम्ही माहिती घेतली असता एकट्या नरंगल युनिटमधील १९४ शेतकऱ्यांना अशा प्रकारचे वीजबिल आले असून, या सर्वांनी वीज कनेक्शन मिळावे व शेतातील कृषीपंपाव्दारे पिकांना पाणी देण्यात यावे, याची मागणी केली होती. मात्र या सर्वांच्या शेतात ना विजेचे पोल, ना विज कनेक्शन, ना मीटर अशी अवस्था दिसून आली असून, शेतकऱ्यांची क्रूरथट्टा करण्याचे काम वीज वितरण कंपनीने केल्याचे स्पष्ट केले आहे. केवळ कागदोपत्रीच खांबे पुरवून तारे जोडून विद्युत पुरवठा करण्यात आल्याची माहिती वीज वितरण कंपनीने एका पत्राद्वारे दिली आहे.

यासंदर्भात वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता आर. आर. कांबळे यांना सामना प्रतिनिधीने विचारणा केली असताना त्यांनी अशा प्रकारचे कनेक्शन देण्यात आले नसल्याचे सांगून अशी दहा हजार प्रकरणे नांदेड जिल्ह्यात असल्याचे स्पष्ट केले. यासंदर्भात राज्यभरातील अशा प्रकाराबद्दल माहिती पुरविण्यात आली असून, वीज वितरण कंपनीचे साहित्य लवकरच पुरवून त्यांना वीज पुरवठा करण्यात येईल, असे उत्तर दिले.

राज्यात हजारो शेतकऱ्यांना वीज पुरवठा केल्याचा दावा वीज वितरण कंपनीने केला असून, हा दावा किती फोल आहे, याचे हे ज्वलंत उदाहरण असल्याचे दिसून आले. दरम्यान, संग्राम पाटील यांनी यासंदर्भात आपण स्वतः शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह ऊर्जामंत्री बावनकुळे यांची भेट घेणार असून, शेतकऱ्यांची अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्याबद्दल कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या