अशोक चव्हाण यांना इच्छेविरुद्ध लोकसभेची उमेदवारी! मुलीला आमदार करण्याचं स्वप्नही भंगणार?

 

काँग्रेसमध्ये असताना सगळे निर्णय मनाप्रमाणे करवून घेणाऱ्या अशोक चव्हाण यांना भाजपमध्ये मात्र तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे. पराभवाच्या भयाने नांदेड लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपकडून निवडणूक लढविण्यास प्रबळ उमेदवारच मिळत नसल्याने अशोक चव्हाण यांना इच्छेविरुद्ध लोकसभेची निवडणूक लढवण्यास भाग पाडले जात आहे, अशी माहिती समोर येत आहे.

काँग्रेसचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळे 20 नोव्हेंबर रोजी विधानसभेबरोबरच नांदेड लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. काँग्रेसने येथून दिवंगत वसंतराव चव्हाण यांचे चिरंजीव रवींद्र चव्हाण यांची उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, या पोटनिवडणुकीत उमेदवार ठरवताना भाजपची बरीच दमछाक होताना दिसते आहे. सार्वत्रिक निवडणुकीत पराभूत झालेले भाजपचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांनी ही पोटनिवडणूक लढवण्यास पक्षाला स्पष्ट नकार कळवला आहे. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत झालेला दगाफटका पुन्हा होऊ शकतो व तसे झाले तर जिल्ह्यातील आपले राजकारणच संपवले जाऊ शकते याची चाहूल लागल्याने चिखलीकरांनी अंग काढून घेतले. लोकसभे ऐवजी लोहा-कंधारमधून विधानसभा लढवू, असे चिखलीकरांनी ठरवले आहे. त्यामुळे भाजपमध्ये डेरेदाखल झालेल्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ही पोटनिवडणूक लढवावी अशी गळ भाजपने अशोक चव्हाण यांना घातली आहे. मात्र, लोकसभा पोटनिवडणूक लढवण्यापेक्षा भोकर विधानसभा मतदारसंघातून कन्येला आमदार करण्यास अशोक चव्हाण यांचे प्राधान्य आहे. तथापि भाजप नेतृत्वाने अशोक चव्हाण यांच्या या योजनेला सुरुंग लावला आहे. लोकसभेची पोटनिवडणूक अशोक चव्हाण यांनीच लढवावी अशी स्पष्ट सूचना पक्षाने चव्हाण यांना केली आहे, असे समजते. भाजपने अलीकडेच चव्हाण यांना राज्यसभेवर पाठवले आहे. आधीच खासदार असताना पुन्हा खासदारकीची निवडणूक लढवणे, हे मतदारांना आवडणार नाही, असा युक्तिवाद चव्हाण यांच्या गोटातून उमेदवारी टाळण्यासाठी करण्यात आला. मात्र लोकसभेत बहुमत नसल्याने एकेक खासदार वाढवणे कसे आवश्यक आहे, हे सांगून अशोक चव्हाण यांनाच बळजबरी घोड्यावर बसवण्याचा ‘पक्षादेश’ झाल्याचे सांगण्यात येते. शिवाय एका कुटुंबात एकच उमेदवारी या न्यायाने विधानसभेला कन्येस उमेदवारी मिळणार नाही, असेही संकेत त्यांना देण्यात आल्याचे समजते. काँग्रेसमध्ये असताना राज्यभरातील निर्णय स्वतः घेणाऱ्या ‘आत्मनिर्भर’ अशोक चव्हाण यांचा मामला आता नांदेड जिल्ह्यातही असा ‘परस्वाधीन’ झाल्याने चव्हाण समर्थक हवालदिल झाले आहेत.

लोकसभा पोटनिवडणुकीसाठी संतुकराव हंबर्डे, माजी आमदार राम पाटील रातोळीकर, मारोतीराव कवळे गुरुजी यांचीही नावे पुढे आली होती. मात्र, पक्षाने अशोक चव्हाण यांच्याच गळ्यात उमेदवारीची माळ घालण्याचे ठरवले आहे ‌. अशोक चव्हाण यांची उमेदवारी निश्चित झाली तर पक्षातील दुसऱ्या गटाला लोकसभेतील पराभवाचा वचपा घेण्याची आयतीच संधी चालून आली आहे. त्यामुळे लोकसभा पोटनिवडणुकीत काय होणार हा संभ्रम कायम असतानाच भोकर विधानसभा मतदारसंघातून पक्षाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. किशोर देशमुख व प्रविण गायकवाड यांची नावे समोर आली आहेत. दरम्यान अशोक चव्हाण यांनी मात्र आपल्याला लोकसभेची उमेदवारी मिळणार असल्याच्या बातम्या ‘कपोलकल्पित’ असल्याचा दावा केला आहे. पण ‘मी कदापि काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाणार नाही’ या दाव्यासारखाच हा दावा आहे, असे नांदेड जिल्ह्यात बोलले जात आहे.