मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी रणरणत्या उन्हात अन्नपाण्याशिवाय तब्बल सात तास ताटकळलेल्या कांताबाई मोरे (52) यांचा भोवळ आल्याने मृत्यू झाला. सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत वाट पाहून शिणलेल्या कांताबाई यांना भोवळ आल्याने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हे प्रकरण दडपण्याचा जोरदार प्रयत्न होत असून वैद्यकीय अधिकाऱ्यांवर दबाव आणून हा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचे सांगण्यात आले आहे.
नांदेड येथे महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सकाळी 11 वाजता प्रारंभ होणाऱ्या या कार्यक्रमासाठी जिल्हाभरातून महिलांना सकाळीच नांदेडात आणण्यात आले. दहा वाजल्यापासून या महिला नवा मोंढा मैदानावर रणरणत्या उन्हात अन्नपाण्यावाचून मुख्यमंत्र्यांची वाट पाहत होत्या. नांदेड तालुक्यातील भणगी येथील कांताबाई मोरे (52) यांनीही सकाळपासून काहीही खाल्ले नव्हते. त्यातच ऑक्टोबर हीट सहन न झाल्याने त्यांना भोवळ आली. त्यांना तात्काळ विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्यांचा आज मृत्यू झाला. हृदयविकाराने कांताबाईंचा मृत्यू झाल्याचे उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
भणगी येथील रहिवासी असलेल्या कांताबाई यांच्या पतीचे काही वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. बचतगटाच्या माध्यमातून त्या संसाराचा गाडा ओढत होत्या. त्यांना दोन मुले आहेत. कांताबाईच्या मृत्यूमुळे ही दोन्ही मुले उघडय़ावर पडली आहेत. सकाळी 11 वाजताचा कार्यक्रम उशिरा सुरू होणार आहे, हे माहिती असतानाही महिलांना लवकर का बोलावण्यात आले, असा प्रश्न कांताबाईंच्या नातलगांनी केला आहे. कांताबाईच्या मृत्यूस सरकार जबाबदार असल्याचा आरोपही या नातलगांनी केला.
दरम्यान, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी महिलेचा मृत्यू दुर्दैवी असून, आजच मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठविल्याचे सांगितले.