फरार अमृतपाल नांदेडमध्ये लपला? पोलीस आणि एटीएस सतर्क, देखरेख वाढवली

खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग सध्या फरार झाला आहे. काही दिवसांपूर्वी जालंधरमध्ये पाठलाग करणाऱ्या पोलिसांना चकवून तो पसार झाला. त्यानंतर पोलीस त्याला शोधण्यासाठी जंगजंग पछाडत आहेत. या पार्श्वभूमीवर अमृतपाल सिंग नांदेडमध्ये लपून बसल्याच्या शक्यतेमुळे महाराष्ट्र पोलीस सतर्क झाले आहेत.

पंजाबच्या पोलीस महासंचालकांनी अमृतपाल याचा शोध घेण्यासाठी लुकआऊट नोटीस जारी केली आहे. त्यानंतर महाराष्ट्र पोलिसांनीही नांदेड आणि आसपासच्या काही जिल्ह्यांमध्ये गस्त वाढवली आहे. जिल्ह्यात दाखल होणाऱ्या आणि जिल्ह्याबाहेर पडणाऱ्यांवर बारीक नजर ठेवण्यात येत आहे. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने यासंदर्भात स्थानिक पातळीवर देखरेख वाढवली आहे.

दरम्यान अमृतपाल सिंहची आणखी एक बाजू समोर आली आहे. अमृतपाल याचे अनेक तरुणींशी प्रेमसंबंध होते. सोशल मीडियावर अनेक तरुणींशी चॅट करायचा आणि त्यांचे अश्लिल व्हिडीओ बनवून त्यांना ब्लॅकमेल करायचा, अशी माहिती समोर येत आहे. तर अमृतपालची पत्नी किरणदीप ही कट्टर खलिस्तानवादी संघटना बब्बर खालसाची सदस्य असून, तिने संघटनेसाठी परदेशातून प्रचंड पैसा गोळा केल्याचे तपासात समोर आले आहे. विशेष म्हणजे 2020 मध्ये तिच्यासह पाच जणांना बब्बर खालसासाठी पैसा गोळा करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.