नांदेड : पोलिसांच्या दडपशाहीमुळे शिवसैनिकांमध्ये संतापाचे वातावरण

विजय जोशी । नांदेड

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भुजंग पाटील यांना जिल्हा पोलीस अधीक्षक व त्यांच्या सहकाऱ्यांनी विनाकारण मारहाण केली असताना पोलिसांची दडपशाही पुन्हा एकदा दिसून आली आहे. शहरात झालेल्या दगडफेक व तोडफोडीच्या घटनेत शिवसैनिकांची नावे गुन्ह्यात गोवल्याने शिवसैनिकांत संतापाचे वातावरण पसरले आहे.

मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दोन दिवसापूर्वी राज कॉर्नर येथे जात असताना त्या आंदोलनात ते ठिय्या मारुन सहभागी झाले. त्याचवेळी जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा व त्यांचे सहकारी त्याठिकाणी येऊन त्यांनी जिल्हाप्रमुख भुजंग पाटील यांना बेदम मारहाण केली. या घटनेचे पडसाद बुधवारी नांदेड शहर व गुरुवारी जिल्ह्याच्या विविध भागात उमटले. मात्र पोलिसांनी पुन्हा एकदा दडपशाही केली आहे. गेल्या दोन दिवसात शहरात झालेल्या दगडफेक व तोडफोडीच्या घटनेत शिवसैनिकांची नावे गोवल्याने शिवसैनिकांत संतापाचे वातावरण पसरले आहे. कुठल्याही सीसीटीव्ही फुटेजमध्ये शिवसैनिकांचा चेहराही दिसत नाही, अनेक शिवसैनिक तर यावेळी बाहेर असताना व आपल्या भागातील वातावरण शांत करत असताना त्यांची नावे वजिराबाद आणि भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाहक गोवण्यात आली आहेत.

मराठा क्रांती मोर्चाला नांदेड जिल्हा शिवसेनेने पाठिंबा दिला, मात्र हे आंदोलन शांततेने व्हावे, त्याला गालबोट लागू नये, हिंसाचार होवू नये यासाठी शिवसैनिक धडपडत असताना नांदेड पोलिसांनी मात्र शिवसैनिकांवरच गुन्हे दाखल केले आहेत. यात स्वतः जिल्हाप्रमुख भुजंग पाटील, नगरसेवक बालाजी कल्याणकर, उपजिल्हाप्रमुख नेताजी भोसले, जिल्हा समन्वयक धोंडू पाटील, शहरप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, शहरप्रमुख पप्पू जाधव, सहसंपर्कप्रमुख उमेश मुंढे, माजी नगरसेवक बाळासाहेब देशमुख, युवासेनेचे माधव पावडे आदींसह अनेक शिवसैनिकांची नावे गोवण्यात आली आहेत. या प्रकाराबद्दल संताप व्यक्त होत आहे.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भुजंग पाटील हे आधार रुग्णालयात सध्या उपचार घेत असून, पोलिसांनी वस्तूस्थिती न जाणता शिवसैनिकांना भडकविण्यासाठी विनाकारण गुन्हे दाखल केले आहेत. याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि पालकमंत्री रामदास कदम यांना लवकरच शिवसैनिकांचे शिष्टमंडळ भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या