कपड्यांची दोन दुकाने फोडून चोरटयांनी साफ केले १० लाख

55

सामना प्रतिनिधी। नांदेड

बुधवारी रात्री गजबजलेल्या एम.जी.रोड वरील दोन कपड्यांची दुकाने फोडून चोरटयांनी जवळपास १० लाख रुपयांची रोख रक्कम पळवली आहे. इतवारा पोलिसांसह जागरूक पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांना चोरट्यांनी दिलेले हे आव्हान कसे उघडकीस येणार हा प्रश्न आता समोर आला आहे.

२ मे ते २४ मे च्या रात्रीतून चोरटयांनी एम.जी.रोड वरील दोन दुकाने छतावर जाऊन फोडली. दोन्ही दुकानांचे छत तिसऱ्या मजल्यावर आहे. घटनास्थळ पाहता या दुकानांच्यावर चोरटे चढलेच कसे असतील यावर सर्वानाच आश्चर्य होत आहे. या दुकानांच्या मागील बाजूस छोटासा रस्ता आहे. त्या रस्त्याच्या मार्गाने चोरटे पाईपच्या साह्याने छतावर चढले असतील आणि अगोदर त्यांनी रामचंद्र रंगनाथ रेवनवार यांच्या दुकानावरील पत्रे कापून आत प्रवेश केला असेल असा अंदाज आहे. रेवनवार यांच्या दुकानातील ६ लाख रुपयांवर डल्ला मारून चोरटयांनी आपला मोर्चा दीपक ड्रेसेसकडे वळवला या दुकानाचे मालक दीपक प्रेमचंदांनी हे आहेत. त्या दीपक ड्रेसेसवर सूर्यप्रकाश येण्यासाठी फक्त २ फूट चौरसामध्ये मोकळी जागा आहे. त्यातून आत प्रवेश करून चोरट्यांनी त्या दुकानातील पावणे चार लाख रुपये चोरट्यांनी पळवले. रेवनवार यांच्या दुकानात एकच काउंटर आहे. दीपक ड्रेसेसमध्ये तीन मजल्यांवर तीन काउंटर आहेत. चोरट्यांनी कपड्यांच्या कोणत्याही जागी हात लावला नाही. फक्त काउंटर फोडून त्या दीपक ड्रेसेस आणि रेवनवार यांच्या दुकानातून चोरटयांनी एकूण जवळपास १० लाख रुपये रोख रक्कम चोरली आहे.

दोन्ही दुकानदारांच्या लक्षात हि चोरीची घटना गुरुवारी सकाळी दुकाने उघडल्यावर आली. त्या नंतर इतवारा पोलीस ठाण्याचा मोठा फौजफाटा, ठसे तज्ज्ञ, श्वान पथक तेथे पोहोचले पण त्यातून काही निष्पन्न झाले नाही. यावरून चोरट्यांनी रेवनवार यांच्या दुकानाला लक्ष करूनच ही चोरीची घटना घडवली असेल आणि छतावर दीपक ड्रेसेस मध्ये उघडा खड्डा पाहून चोरट्यांचा डाव साधण्यासाठी आयतीच संधी प्राप्त झाली होती. या बाबत इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, आणि पुढील तपास कुशल पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी निरस्त केलेले गुन्हे शोध पथक इतवाराच्या पोलीस निरीक्षकांनी रमजान महिन्याच्या पहिल्या दिवशी कार्यरत केले होते. पण काही तासातच ते गुन्हे शोध पथक नसून फक्त रमजान गस्त पथक आहे असा प्रचार इतवारा पोलीस ठाण्यातूनच सुरु झाला आणि त्या पथकाचे स्वातंत्र्य हिरावला सारखे झाले.

आपली प्रतिक्रिया द्या