मराठा आरक्षणासाठी आमदार सुहास कांदे रस्त्यावर, स्वत:च्या सरकारविरोधात आंदोलन

शिवसेनेसोबत गद्दारी करून मिंधे गटात गेलेले नांदगावचे आमदार सुहास कांदे हे देखील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी रस्त्यावर उतरले आहेत. नांदगाव छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील हुतात्मा स्मारकाजवळ सकल मराठा समाजातर्फे ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. त्या आंदोलनात सुहास कांदे सहभागी झाले होते. त्यांनी रस्त्यावर बसून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी घोषणा दिल्या.

जालन्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सनदशीर मार्गाने सुरू असलेले आंदोलनावर 2 सप्टेंबर रोजी पोलिसांनी बेछूट लाठीचार्ज केला. या अमानुष लाठीहल्ल्यात तरुणांसह महिला, लहान मुले, वृद्धांवर रक्तबंबाळ होईपर्यंत पोलिसांनी लाठय़ा चालवल्या. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात त्याचे संतप्त पडसाद उमटत आहेत.