टँकरचा प्रस्ताव पाठवूनही प्रशासन सुस्तच नांदगाववासीयांवर आली पाणी विकत घेण्याची वेळ

13

सामना ऑनलाईन, नांदगाव

नांदगाव तालुक्यातील घाटमाथा वरील बोलठाण, गोंडेगांव, जवळकी, रोहिले, जातेगाव या गावांना पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली असतानाच तालुकास्तरावर स्थानिक प्रशासनाने पाणीटंचाईबाबत तालुकास्तरावर प्रस्ताव पाठवूनही दखल घेतली जात नसल्याने परिसरातील नागरिकांना विकत पाणी घेण्याची वेळ आली आहे.

नांदगाव तालुक्याचा विचार करता घाटमाथा परिसरावर गेल्या दोन- तीन वर्षांपासून दुष्काळाची छाया असून ती वर्षानुवर्षे गडद होत चालली आहे. परिसरातील विहिरी, तलाव, कूपनलिका आदी जलस्रोतांनी हिवाळ्यात तळ गाठल्याने यंदा पाणीटंचाई तीव्र स्वरूपात जाणवणार याची सर्वांना कल्पना असताना उन्हाचा पारादेखील कधी नव्हे इतका तापल्याने पाणीटंचाईने रौद्ररूप धारण केले आहे. सर्व धर्मांमध्ये विविध प्रकारच्या दानधर्माला महत्त्व आहे. त्यातही पाणी हा सगळ्याच धर्मात विशेष मुद्दा राहिला आहे. असे असताना बोलठाण परिसरात ५० रुपयांत २०० लिटर पाणी घेण्याची वेळ नागरिकांवर येऊन ठेपली आहे. एकीकडे महागाई गगनाला भिडत असताना दुसरीकडे पाणीदेखील विकत घेण्याची वेळ आल्याने सामान्य माणसाने जगावे तरी कसे? असा प्रश्न बोलठाणकरांना पडला आहे.

बोलठाणसह परिसरात सध्या ५ हजार लिटर क्षमता असलेल्या पाणी टँकरच्या १० ते १५ चकरा होतात. यामुळे पाणी विक्री करणारे लाखात पैसे मोजताना दिसून येतात. तर गोरगरीब जनतेच्या खिशाला कात्री लागत असल्याने त्यांचा जीव कासावीस होतो. गोंडेगाव, जवळकी या गावांतदेखील यापेक्षा वेगळी परिस्थिती नसून काही दिवसांत तर ५० रुपये मोजूनही पाणी मिळते की नाही, असा प्रश्न पडत असल्याचे ग्रामपंचायत सदस्य निवृत्ती खुटे यांनी सांगितले. तसेच या प्रकाराबाबत तालुकास्तरावरदेखील दखल घेतली नसल्याची नाराजी गोंडेगाव ग्रामपंचायत सदस्या अर्चना जाधव यांनी बोलून दाखवली. या सर्व पार्श्वभूमीवर तालुका प्रशासनाने परिसरातील काही कूपनलिका, विहिरी अधिग्रहित केल्या, मात्र ज्या केल्या त्यांनीही आता हे राम म्हटल्याने नागरिकांनी करायचे तरी काय? असा प्रश्न पडला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या