शिवसेनेचा स्वाभिमान-राष्ट्रवादीला दे धक्का; तालुकाध्यक्षांसह चार नगरसेवकांनी बांधले शिवबंधन

1708

स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष तथा मालवण नगरपालिकेतील विरोधी पक्षनेते मंदार केणी, नगरसेवक यतीन खोत, राष्ट्रवादीच्या नगरसेविका दर्शना कासवकर व शीला गिरकर यांनी शनिवारी मुंबई मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधत भगवा खांद्यावर घेतला.

दरम्यान, येत्या काळातही अनेक राणेसमर्थक शिवसेनेत दाखल होतील, असा सूचक इशाराही आमदार वैभव नाईक यांनी यावेळी दिला.

मालवण पालिकेतील चार नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागण्याची चर्चा दोन दिवस शहरात सुरू होती. अखेर त्यांचा पक्षप्रवेश झाला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह केंद्रीय अवजडमंत्री अरविंद सावंत, शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, मुंबईचे महापौर विश्‍वनाथ म्हाडेश्‍वर, अनिल पाटणकर, मालवणचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, माजी सभापती पूनम खोत, शिल्पा खोत, आबा खोत, परशुराम खोत, भाई कासवकर, रोहित मेथर, मनोज मेथर, बंड्या पराडकर, राणी पराडकर, काजल कांदळगावकर यांच्यासह अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हा पदाधिकाऱ्यांकडून खच्चीकरण

काँग्रेस तसेच स्वाभीमान पक्षाचा तालुकाध्यक्ष म्हणून काम करत असताना तालुक्यात पक्षाचा आलेख चढता ठेवला. लोकसभा, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत निवडणुकीत चांगले यश मिळवून दिले. मात्र जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकार्‍यांनी सातत्याने खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला. राणेंसोबत राहणार्‍या या पदाधिकार्‍यांनी त्यांच्याविषयीही गावागावात गैरसमज, बैठका घेण्याचे काम केले. याची कल्पना राणेंना देऊनही त्यांच्याकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही, असे मंदार केणी यांनी यावेळी सांगितले.

प्रामाणिकपणे संघटनात्मक कामावर भर देऊ – केणी

तालुक्याचा विकास हा शिवसेनेच्या माध्यमातून होऊ शकतो असा विश्‍वास असल्यानेच आम्ही शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. येत्या काळात प्रामाणिकपणे संघटनात्मक कामावर भर देऊ असे मंदार केणी यांनी प्रवेशानंतर स्पष्ट केले.

राणेंच्या भाजप प्रवेशाच्या अनेक तारखा

नारायण राणेंनी भाजप पक्षप्रवेशाचा आतापर्यत अनेक तारखा दिल्या आहेत. भाजपात मेगा भरती सुरू असतानाही त्यांचा भाजप प्रवेश झाला नाही. राणे आपल्या मुलांसाठी हा खटाटोप करताहेत हे त्यांच्या कार्यकर्त्यांना कळून चुकले आहे. त्यामुळे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आपल्या भवितव्याचा विचार करत शिवसेनेत प्रवेश करत आहेत, असे आमदार नाईक यांनी यावेळी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या