नारायण राणे-उदय सामंत बॅनरवॉर म्हणजे इटुकल्या बिटुकल्यांची लढाई; विनायक राऊत यांचा टोला

नारायण राणे आणि उदय सामंत यांच्यात जे बॅनरवॉर सुरु आहे ते म्हणजे इटुकल्या बिटुकल्यांची लढाई आहे. मी त्याला फार महत्व देत नाही आणि महत्व देण्याची गरजही नाही, असे शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, माजी खासदार विनायक राऊत यांनी सांगितले. लोकसभा निवडणूकीतील पराभवाने खचून जाऊ नका. मात्र, आत्मपरिक्षण नक्की करा. अभ्यास करा. आपल्याला पुढे जायचे आहे. सप्टेंबरमध्ये विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू होईल. त्या दृष्टीने आपल्याला तयारी करायची आहे, असे आवाहनही विनायक राऊत यांनी कार्यकर्त्यांना केले. रत्नागिरीतील मराठा सभागृहात इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी हे आवाहन केले.

लोकसभा निवडणूकीतील पराभवानंतर शिवसेना नेते विनायक राऊत यांनी मतदार संघात संपर्क दौरा सुरु केला आहे. रत्नागिरी विधानसभा मतदार संघातील इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले की, निवडणूकीत हरलो म्हणून पळ काढणारा मी नाही. मी लढणारा आहे. पुन्हा एकदा या कोकणाला शिवसेनेचे गतवैभव प्राप्त करून दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. नारायण राणेंची पत्रकार परिषद झाली. त्यावेळी ते मुंबई-गोवा महामार्गावर बोलतील असे वाटले होते. वीज पुरवठ्यावर अनियमितता आहे. त्यावर बोलतील असे वाटले होते. पण राणे विकासावर काही बोललेच नाहीत. आपल्या वक्तव्यात रवींद्र चव्हाणांचे नाव घेतले नाही. भाजपाचेही नाव घेतले नाही. फक्त आपल्या कुटूंबाचेच आभार मानले आणि रिफायनरी करणार म्हणून सांगितले. त्यातच त्यांचा जीव अडकला आहे, अशी टीका विनायक राऊत यांनी केली. राणेनी शिवसेना संपवणार अशी वल्गना केली. शिवसेना संपवणारी औलाद अजून जन्माला आलेली नाही, असेही राऊत यांनी ठणकावले.

आता कोकण पदवीधर विधान परिषद निवडणूक आहे. त्यामध्ये महाविकास आघाडीचे रमेश कीर उमेदवार आहेत. मतपत्रिकेवर त्यांचे पहिल्या क्रमांकावर नाव आहे. मतपत्रिकेत त्यांच्या नावासमोर इंग्रजीत 1 आकडा लिहून त्यांना विजयी करुया असे आवाहन त्यांनी केले. यावेळी सिंधुदुर्ग संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, लोकसभा संपर्क प्रमुख राजेंद्र महाडीक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, जि.प.चे माजी उपाध्यक्ष उदय बने, विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रमोद शेरे, तालुकाप्रमुख प्रदीप साळवी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सचिव बशीर मुर्तुझा, तालुका अध्यक्ष राजन सुर्वे, जिल्हा उपाध्यक्ष मिलींद कीर, शहराध्यक्ष नीलेश भोसले, शिवसेनेच्या महिला लोकसभा संघटक नेहा माने, जिल्हा संघटक वेदा फडके, तालुका संघटक साक्षी रावणंग, सायली पवार, शहर संघटक मनिषा बामणे, उपजिल्हाप्रमुख संजय साळवी, गीतेश राऊत व इतर पदाधिकारी उपस्थित होते.