ट्रॅफिक जाममुळे ‘या’ सुंदर अभिनेत्रीने मुंबई शहर सोडले, मराठी चित्रपटांमध्येही केले आहे काम

6527

मुंबईतली गर्दी, रेटारेटी आणि रोजचं ट्रॅफिक यांमुळे मुंबईच्या जीवनाला बरेच जण वैतागतात. अनेक जणांना हे शहर सोडून दुसरीकडे स्थायिक व्हावं असं वाटतं. पण, एका अभिनेत्रीने हा विचार प्रत्यक्षात आणला आहे. चित्रीकरणासाठी प्रवास करताना लागणाऱ्या ट्रॅफिकला वैतागून ही अभिनेत्री मुंबई सोडून वेगळ्याच ठिकाणी राहायला गेली आहे.

narayani-shahstri-with-moth

या अभिनेत्रीचं नाव आहे नारायणी शास्त्री. विविध मालिका आणि चित्रपटांमध्ये भूमिका करणारी नारायणी गेल्या दोन महिन्यांपासून मुंबईबाहेर राहत आहे. मूळची मुंबईकर असलेली नारायणी पूर्वी अंधेरी येथे राहत होती. त्यावेळी तिला आलेल्या अनुभवांविषयी ती म्हणाली की, मी अंधेरीला राहताना गोरेगाव किंवा मालाड येथे चित्रीकरणासाठी जात होते. तेव्हा मला तितका वेळ लागत नव्हता. मात्र, आता सगळे सेट्स नायगाव येथे स्थलांतरित केले आहेत. त्यामुळे मला घरून निघून सेटवर पोहोचण्यासाठी कमीत कमी 2-3 तास तरी लागतात. त्यामुळे मी हे शहर सोडून दुसरीकडे राहायचा निर्णय घेतला, असं नारायणीचं म्हणणं आहे.

narayani-shastri-with-beaut

नारायणीचा पती स्टिव्हन ग्रॅव्हर हा चित्रकार आहे. त्यालाही चित्रांसाठी शांत ठिकाणाची आवश्यकता होती. त्यामुळे या दांपत्याने मुंबईहून गोव्याला स्थायिक व्हायचा निर्णय घेतला आहे. नारायणी सध्या गोव्यात तिचा पती, दोन कुत्रे आणि नऊ मांजरींसोबत एका प्रशस्त घरात राहत आहे. गोव्यात सिओलीम या गावात ती राहत असून तिच्या घराचा परिसर निसर्गरम्य आहे.

narayani-shashtri-two-looks

अर्थात ती मुंबईत राहत नसली तरी तिच्यासाठी मुंबई नेहमीच एक स्वप्ननगरी असल्याचं तिचं म्हणणं आहे. फक्त तिथे वाढत असलेल्या गर्दीला आणि त्यामुळे होणाऱ्या ट्रॅफिकला सर्वच वैतागल्याचं ती सांगते. भविष्यात मुंबईत काम करायची वेळ आली तर गोवा ते मुंबई असा प्रवास करण्याऐवजी मुंबईतच घर भाड्याने घेण्याला तिचं प्राधान्य असेल. चित्रीकरण आटोपलं की मी पुन्हा माझ्या मूळ घरात, अर्थात गोव्याला परतेन, असंही नारायणी हिचं म्हणणं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या