नक्षलवाद्यांनी छत्तीसगडच्या नारायणपूरमध्ये जवानांवर निशाणा साधला आहे. नक्षलवाद्यांनी घुरबेरा भागात आयईडी स्फोट घडवून आणला. या स्फोटात चार जवान जखमी झाले आहेत. दरम्यान जखमी जवानांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी दोन जवानांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना रायपूरला पाठवण्याची तयारी सुरू होती. मात्र तेथे नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. अमर पनवार आणि के राजेश अशी शहीद जवानांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आयटीबीपी-बीएसएफची संयुक्त टीम ओरछा, मोहंडी आणि इरकभट्टी येथे गस्तीवर होती. यादरम्यान आयडी स्फोटात चार जवान जखमी झाले. काही दिवसांपूर्वी या परिसरात नक्षलवाद्यांची पोलिसांशी चकमक झाली होती. चकमकीनंतर शुक्रवारी परिसरात शोधमोहीम राबविण्यात आली होती. शोधमोहिमेनंतर शनिवारी सैनिक परतत होते.
दरम्यान, याच वेळेचे संधी साधून नक्षलवाद्यांनी आयईडीचा स्फोट केला. या स्फोटात चार जवान जखमी झाले. स्फोटाच्या आवाजाने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्फोटात जखमी झालेल्या जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अशी माहिती एसपी प्रभात कुमार यांनी सांगितली आहे.