एच.एम.व्ही. आणि लाऊडस्पीकर; मोदींकडून देशवासीयांच्या अपेक्षा!

18

पंतप्रधान मोदी यांचे व्यक्तिमत्त्व हे शिखर पुरुषाचे आहे. त्यामुळे पायथ्यावरचे लोक शिखराकडून अपेक्षा ठेवतात. सरसंघचालकांनाही तेच सुचवायचे आहे. सरसंघचालकांनी देशवासीयांच्या अपेक्षांना तोंड फोडले म्हणून आम्ही विषयांतर केले. पंतप्रधान मोदींकडून अपेक्षा आहेतच. अपेक्षा मोदींकडून बाळगायच्या नाहीत तर कोणाकडून ठेवायच्या? सरसंघचालक हे भारतीय जनता पक्षाचे हिज मास्टर्स व्हॉईसआहेत. आम्ही जनतेच्या मनाचे लाऊडस्पीकर आहोत. आमचा आवाज घुमणारच!

सरसंघचालक म्हणजे भारतीय जनता पक्षाचे ‘हिज मास्टर्स व्हॉईस’ आहेत, याबाबत कुणाचेच दुमत असण्याचे कारण नाही. सरसंघचालक मोहन भागवत यांनी आता असे सांगितले आहे की, पंतप्रधान मोदी यांच्याकडून देशवासीयांना मोठय़ा अपेक्षा आहेत. नव्या पिढीने पंतप्रधानांकडून आदर्श घ्यावा, असे भागवतांनी बजावले आहे. आम्ही सरसंघचालकांच्या भूमिकेशी सहमत आहोत. संघालाही मोदी यांच्याकडून नक्कीच वेगळय़ा अपेक्षा असणार. संघाच्या व देशवासीयांच्या अपेक्षा वेगळय़ा नसणार. त्यामुळे संघाच्या अपेक्षा पूर्ण झाल्या आहेत काय, हे आधी स्पष्ट व्हायला हवे. देशवासीयांची अशी अपेक्षा होती की, मोहन भागवत म्हणजेच सरसंघचालक हेच देशाचे राष्ट्रपती होतील. भारतीय जनता पक्षाकडून भागवतांचे नाव राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून जाहीर झाले असते तर देशात आनंदाचे उधाणच आले असते; कारण हिंदू राष्ट्रनिर्मितीपासून पाकिस्तानला चिरडून मारण्यापर्यंत संघाची ठाम भूमिका आहे व त्या भूमिकेची अंमलबजावणी पंतप्रधानांसोबत करणे राष्ट्रपतींना शक्य झाले असते. देशवासीयांची ही अपेक्षा होती. कारणे काहीही असोत, पण ही अपेक्षा पूर्ण होऊ शकली नाही. आता सरसंघचालकांच्या अपेक्षांना वेगवान मार्ग दाखविण्याची जबाबदारी पंतप्रधान मोदींवर आहे. मोदी यांचा जीवन प्रवास हा रोमांचक व अभिमानास्पद असल्याचे भागवत यांनी सांगितले आहे. गोष्टी होत नाहीत यावर नव्हे तर प्रत्येक गोष्ट होत आहे

या तत्त्वावर

मोदींचा ठाम विश्वास आहे. मोदींच्या व्यक्तिमत्त्वाचा लोकांनी जवळून अभ्यास करावा, असे मत सरसंघचालकांनी व्यक्त केले आहे. कश्मीर पेटले असताना व अमरनाथ यात्रेकरूंवर निर्घृण हल्ला झाला असताना सरसंघचालकांचे हे विचार प्रकट व्हावेत याला काहीतरी अर्थ आहे. मनमोहन सिंग हे कमजोर व दुबळे पंतप्रधान असल्याची टीका निवडणुकीआधी सगळेच करीत होते. कश्मीरातील हिंसाचार व पाकडय़ांचा माजोरडेपणा मोडून काढायचा असेल तर देशाला एक मजबूत पंतप्रधान हवा असल्याची द्वाही फिरवल्यामुळेच सत्तांतर घडून मोदी पंतप्रधान झाले आहेत. संघ स्वयंसेवकांनी त्यासाठी दिवसरात्र कष्ट घेतलेच आहेत. त्यामुळे मोदींकडून देशवासीयांना मोठय़ा अपेक्षा आहेत, असे ठणकावून सांगण्याचा अधिकार सरसंघचालकांना आहेच. राहुल गांधी, लालू यादव, मुलायम सिंग यांच्याकडून देशवासीयांना काय अपेक्षा असणार? त्यामुळे देश अपेक्षेने फक्त मोदींकडेच पाहणार. मोदी हेच आज जननायक आहेत व ते कोणताही चमत्कार करू शकतात, असे त्यांच्या भक्तांना वाटत असेल तर त्यात काय चुकले? सर्वोच्च पदी बसलेल्या कोणत्याही व्यक्तीकडून देशवासीय अपेक्षा ठेवतच असतात. आपल्या देशाची मानसिकता व लोकशाहीचे थोतांड असे आहे की, अपेक्षा व्यक्तीकडून नाही तर पदाकडून असतात. अर्थात

अपवाद फक्त

महात्मा गांधी व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा. देवेगौडा पंतप्रधान झाले तेव्हा त्यांच्या जीवन प्रवासाचा आदर्श घ्यावा असे त्यांच्या भक्तांकडून सांगितले गेले. मनमोहन सिंग यांच्या बाबतीत तेच घडले. उद्या राहुल गांधी यांच्या हाती सत्तेची सूत्रे आलीच तर ‘पप्पू’ महाशयांचा जीवन प्रवासही आदर्श ठरवला जाईल, पण शेवटी पंतप्रधान मोदी यांचे व्यक्तिमत्त्व हे शिखर पुरुषाचे आहे. त्यामुळे पायथ्यावरचे लोक शिखराकडून अपेक्षा ठेवतात. सरसंघचालकांनाही तेच सुचवायचे आहे. कश्मीरात जवानांचे प्राण जात आहेत व तेथे एक प्रकारे अराजकच सुरू आहे. देशभरात लागू झालेली ‘जीएसटी’ म्हणजे ‘एक देश एक करप्रणाली’ हे मोदींचे स्वप्न जम्मू-कश्मीरात लागू होऊ शकले नाही. हिंदुस्थानचे सर्व कायदे व नियम जम्मू-कश्मीरातही लागू व्हावेत ही मोदींकडून संघाची व देशाचीही अपेक्षा असावी. ‘जीएसटी’चा परिणाम मुंबईच्या डबेवाल्यांच्या सेवेवरही झाला. डबेवाले दीडशे रुपयांनी महागले. म्हणजे नोटाबंदी व ‘जीएसटी’चा फटका शेतकरी तसेच सामान्यांनाच बसत असल्याचा आमचा अंदाज खरा ठरत आहे. सरसंघचालकांनी देशवासीयांच्या अपेक्षांना तोंड फोडले म्हणून आम्ही विषयांतर केले. पंतप्रधान मोदींकडून अपेक्षा आहेतच. अपेक्षा मोदींकडून बाळगायच्या नाहीत तर कोणाकडून ठेवायच्या? सरसंघचालक हे भारतीय जनता पक्षाचे ‘हिज मास्टर्स व्हॉईस’ आहेत. आम्ही जनतेच्या मनाचे लाऊडस्पीकर आहोत. आमचा आवाज घुमणारच!

आपली प्रतिक्रिया द्या