नरेंद्र मोदी-उद्धव ठाकरे यांची 26 एप्रिलला बीकेसी मैदानावर सभा

55
modi-uddhav

सामना प्रतिनिधी, मुंबई

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात मुंबईसह ठाणे, भिवंडी, पालघर आदी मतदारसंघांत होणाऱया मतदानाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शुक्रवार, 26 एप्रिलला महायुतीची सभा एमएमआरडीएच्या बीकेसी मैदानावर आयोजित करण्यात आली आहे.

भाजपचे मुंबई अध्यक्ष व आमदार ऍड. आशीष शेलार यांनी प्रचारसभांची माहिती देण्यासाठी प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी त्यांनी महायुतीच्या सभेची माहिती दिली. ते म्हणाले, 26 एप्रिलला सायंकाळी 7 वाजता बीकेसी मैदानावर महायुतीची विराट सभा होईल. सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांचीही भाषणे होतील. ही सभा यशस्वी करण्यासाठी शिवसेना खासदार अनिल देसाई, आमदार ऍड. अनिल परब, सुमंत घैसास व आपण स्वतः मेहनत घेत असल्याचे आशीष शेलार म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 23 व 24 एप्रिलला मुंबईत सभा होतील.

आशीष शेलार यांची राज ठाकरेंवर टीका
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या आरोपांना उत्तर कधी देणार, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता आशीष शेलार यांनी राज ठाकरे यांचे वर्णन ‘चिंतातुर जंतू’ असे वर्णन करीत राम गणेश गडकरी यांची ‘चिंतातुर जंतू’ ही कविता वाचून दाखवली.

आपली प्रतिक्रिया द्या