मोदींनी उर्जित पटेलांची तुलना सापाशी केली होती, माजी वित्त सचिवांचा खळबळजनक खुलासा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेल यांचा उल्लेख पैशांच्या राशीवर बसलेला साप असा केल्याचा खळबळजनक खुलासा माजी वित्त सचिवांनी केला आहे. माजी वित्त सचिव सुभाष गर्ग यांनी आपल्या पुस्तकात हा खुलासा केला आहे.

सुभाष गर्ग यांनी लिहिलेलं ‘वी ऑल्सो मेक पॉलिसी’ हे पुस्तक ऑक्टोबर महिन्यात प्रकाशित होणार आहे. तत्पूर्वी या पुस्तकातील काही खुलास्यांमुळे खळबळ उडाली आहे. या पुस्तकात लिहिल्यानुसार, कठीण आर्थिक परिस्थिती आणि भारतीय रिझर्व्ह बँक यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी 14 सप्टेंबर 2018 रोजी एक बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तत्कालीन आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेल यांच्यावर आगपाखड केली होती. यावेळी त्यांनी पटेल यांची तुलना पैश्यांच्या राशीवर बसलेल्या सापाशी तुलना केली होती, असं गर्ग यांनी आपल्या पुस्तकात म्हटलं आहे.

या बैठकीला उर्जित पटेल, तत्कालीन अर्थमंत्री दिवंगत अरुण जेटली आणि प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा यांच्यासह अन्य सरकारी अधिकारी उपस्थित होते. जवळपास दोन तास ही बैठक सुरू होती. तरीही यातून काहीही ठोस निष्पन्न होताना दिसत नव्हतं. त्यामुळे चिडलेल्या मोदींनी पटेल यांना साप म्हटलं असा खळबळजनक खुलासा गर्ग यांनी आपल्या पुस्तकात केला आहे.

उर्जित पटेल यांनी काही शिफारशी सुचवल्या होत्या. पण, पटेल यांनाही सरकारचं धोरण पटत नव्हतं. तत्कालीन सरकार हे रिझर्व्ह बँकेसह असलेल्या आपल्या मतभेदांना दूर करण्यासाठी काहीही पावलं उचलत नव्हतं किंवा मागे हटायलाही तयार नव्हतं. तर दुसरीकडे रिझर्व्ह बँकेतील आरक्षित अर्थसाठा वापरू देण्यास पटेलांची परवानगी नव्हती. त्यावरून पंतप्रधान मोदी पटेलांवर चिडले. त्यानंतर काही काळाने पटेल यांनी राजीनामा दिला होता. या घटनाक्रमांचा उल्लेख त्यांनी उर्जित पटेल यांचा राजीनामा या अध्यायात केला आहे.