राहुल गांधींच्या घरात पोलीस घुसले! मोदी सरकारच्या राजकीय सूडनाट्याचा तिसरा अंक

मोदी सरकारने आज आणखी एक राजकीय सूड उगवला. ‘भारत जोडो यात्रा’ दरम्यान तब्बल 45 दिवसांपूर्वी श्रीनगरमध्ये केलेल्या वक्तव्याची चौकशी करण्यासाठी दिल्ली पोलिसांचे पथक आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या घरात घुसले आणि त्यानंतर राजकीय वातावरण तापले. काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी या ‘घुसखोरी’चा तीव्र निषेध केला असून भाजप आणि मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

आज सकाळी साडेदहाच्या सुमारास दिल्ली पोलिसांचे विशेष आयुक्त सागरप्रीत हुडा (कायदा आणि सुव्यवस्था) हे आपल्या पथकासह राहुल गांधी यांच्या घरी अचानक धडकले. महिलांवरील अत्याचारासंदर्भात राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान श्रीनगर येथे केलेल्या वक्तव्यासंदर्भात दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी यांना नोटीस पाठवली होती. त्याच संदर्भात चौकशीसाठी हे पथक त्यांच्या घरी पोहोचले होते.

आयुक्त हुडा यांची राहुल गांधी यांच्यासोबत यावेळी तब्बल दोन तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर हुडा यांनी माध्यमांशी संवाद साधला. महिलांवरील अत्याचाराबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल राहुल गांधी यांच्याकडे माहिती मागितली असून त्यांनी त्यासाठी वेळ मागितला असल्याचे हुडा यांनी सांगितले. यात्रेदरम्यान आपण अनेक लोकांना भेटलो. त्यामुळे आपण केलेल्या वक्तव्याबाबत आणखी माहिती घ्यावी लागेल असे राहुल गांधी यांनी सांगितल्याने हुडा यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. संबंधित महिलांना न्याय मिळावा हाच यामागचा उद्देश असल्याचा दावाही त्यांनी केला.

केंद्रीय गृह मंत्रालय किंवा केंद्रीतील वरिष्ठांचे आदेश आल्याशिवाय पोलिसांनी ही कारवाई केलेली नाही. चौकशीला कुणीही नकार दिलेला नाही. नोटिसीला उत्तर देईन असे राहुल गांधींनी सांगूनही पोलीस त्यांच्या घरी पोहोचले. हे फार गंभीर आहे. संपूर्ण देश पाहतोय.
– अशोक गहलोत, मुख्यमंत्री, राजस्थान

राहुल गांधी यांना घाबरवण्याचा प्रयत्न केला जातोय. सरकारला काय वाटतेय, राहुल गांधी घाबरतील?
– पवन खेडा, काँग्रेस प्रवक्ते

मोदींच्या दडपशाहीला काँग्रेस भीक घालत नाही
राहुल गांधी यांचा आवाज दडपण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रयत्न कधीच यशस्वी होणार नाही. हुकूमशाही वृत्तीच्या मोदी सरकारच्या दडपशाहीला राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष भीक घालत नाही. अदानी-मोदींचे काळे सत्य काँग्रेस पक्ष देशासमोर आणणारच. अदानी-मोदींच्या महाघोटाळय़ाविरोधात राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आवाज उठवत राहू.
– नाना पटोले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

यात्रेदरम्यान कुठलीही महिला रडताना दिसली नाही
आयुक्त हुडा यांनी सांगितले की, ‘राहुल गांधी यांनी केलेले वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर आम्ही दिल्लीतील यात्रेदरम्यानचे व्हिडीओही पाहिले. कुणी महिला राहुल गांधींना भेटली का हेसुद्धा तपासले, परंतु तपासात तसे काहीही आढळून आले नाही. यात्रेदरम्यान कुठलीही महिला रडताना दिसली नाही. राहुल गांधी यांच्याशी त्याबाबत चर्चा करण्याचा विचार केला, परंतु ते परदेशात गेले होते. ते परतल्यानंतर आम्ही त्यांच्या घरी पोहोचलो.’
– राहुल गांधी यांची जबानी घेण्यासाठी दिल्ली पोलिसांचे एक पथक गेल्या 15 मार्च रोजी राहुल यांना नोटीस देण्यासाठी गेले होते. तीन तास प्रतिक्षा केल्यानंतरही त्यांची राहुल गांधी यांच्याशी भेट झाली नव्हती. 16 मार्चला पुन्हा वरिष्ठ पोलीस अधिकारी गेले होते. दीड तासानंतर त्यांची राहुल गांधी यांच्याशी भेट झाली. त्यावेळी राहुल गांधींनी ती नोटीस स्वीकारली होती. योग्य वेळी त्या नोटीशीला उत्तर दिले जाईल असे त्यावेळी काँग्रेस पक्षाकडून सांगण्यात आले होते.
– दिल्ली पोलिसांनी अत्याचारपीडीत महिलांबद्दल माहिती मिळावी म्हणून राहुल गांधी यांना एक प्रश्नांची यादी पाठवली होती. त्या प्रश्नांची उत्तरे लवकर आणि सविस्तर द्या म्हणजे संबंधित महिलांना सुरक्षा पुरवता येईल असे दिल्ली पोलिसांनी म्हटले होते.

राहुल यांच्या प्रश्नांना सरकार घाबरले
‘पंतप्रधान मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांचे संबंध, अदानी-हिंडनबर्ग प्रकरण याबाबत राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना सरकार घाबरले आहे. म्हणूनच पोलिसांचा आधार घेतला जातोय. भारत जोडो यात्रा संपल्यानंतर 45 दिवसांनी दिल्ली पोलीस अत्याचार पीडित महिलांची माहिती मागत आहेत.’

विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी…
विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी मोदी सरकारने ईडी, सीबीआयला कामाला लावलेच आहे, पण आता पोलिसी बळाचाही वापर सुरू केला आहे. अदानी प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या सरकारच्या निशाण्यावर आहेत राहुल गांधी. पहिल्यांदा लोकसभेत राहुल यांचा माईक बंद केला, नंतर त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याच्या हालचाली सुरू झाल्या व आता पोलीस घरात घुसवले.

30 जानेवारी 2023, श्रीनगर
अनेक महिला मला भेटायला आल्या होत्या. त्यातील काहींनी त्यांच्यावर लैंगिक अत्याचार आणि त्यांचा विनयभंग झाल्याचे सांगितले. त्याबाबत पोलिसांना सांगू का असे मी त्यांना म्हटले. पोलिसांना सांगितलात तर आम्हाला आणखी त्रास होईल असे त्या म्हणाल्या.

दिल्ली पोलिसांना इतकी काळजी होती तर ते फेब्रुवारीमध्ये का आले नाहीत. भारत जोडो यात्रा संपल्यानंतर 45 दिवस उलटले. आता ते चौकशीसाठी येत आहेत.
– जयराम रमेश, काँग्रेस नेते

पत्रकारांनी विचारले, तुमचा काय संबंध?
श्रीनगरमधील वक्तव्याचा दिल्ली पोलिसांशी काय संबंध? असा प्रश्न यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारला असता आयुक्त हुडा हे गडबडले. त्यावर ‘भारत जोडो यात्रा दिल्लीतून गेली होती. त्यावेळी मी स्वतŠ तिथे होतो. राहुल गांधीही येथेच राहतात. त्यामुळे कुणीही पीडीत असेल तर दिल्लीतील असेल किंवा दुसऱया राज्यातील असेल तर तातडीने कायदेशीर प्रक्रिया सुरू करता येईल’, अशी सारवासारव हुडा यांनी केली.