मोदी सरकार RBI कडे 45 हजार कोटींची अर्थसहाय्यता मागणार ?

471

हिंदुस्थानात आर्थिक मंदीचे संकट अधिक गडद होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार रिझर्व्ह बँकेकडे 45 हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य मागणार असल्याचे वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिले आहे. केंद्र सरकारचा महसूल वाढावा यासाठी हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. असं झालं तर पुन्हा एकदा केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेमध्ये मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे.

रिझर्व्ह बँकेने केंद्र सरकारला लाभांशापोटी 1.76 लाख कोटी रुपये देणार असल्याचे सांगितले होते. या रकमेतील 1.48 लाख कोटी रुपये चालू आर्थिक वर्षात म्हणजेच 2019-2020 या वर्षात देण्यात आलेले आहेत. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार रिझर्व्ह बँकेला रोकड आणि सरकारी रोख्याच्या व्यवहारातून मोठ्या प्रमाणावर नफा होत असतो. यातील एक हिस्सा रिझर्व्ह बँक त्यांच्या कामकाजासाठी आणि आपातकालीन परिस्थितीसाठी राखून ठेवत असते. उरलेली रक्कम ही लाभांशापोटी सरकारला परत केली जात असते.

रॉयटर्सला एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार यंदाचं आर्थिक वर्ष हे अत्यंत बिकट स्वरुपाचं आहे. गेल्या 11 वर्षातील सर्वात कमी विकास दर हा यंदाच्या आर्थिक वर्षात नोंदवण्यात आला आहे. सध्या विकास दर हा 5 टक्के असून रिझर्व्ह बँकेकडून जर केंद्र सरकारला अर्थसहाय्य मिळाले तर मोठा दिलासा मिळू शकतो. ही प्रथा पाडण्याचा आमचा प्रयत्न नाहीये, मात्र यंदाचं आर्थिक वर्ष हा अपवाद म्हणून पाहायला हवं असं रॉयटर्सला बातमी देणाऱ्या सूत्रांनी म्हटले आहे. रिझर्व्ह बँक केंद्र सरकारला 35 ते 45 हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य करू शकते असं सांगितलं जात आहे.

केंद्र सरकारची आर्थिकसहाय्याची मागणी मान्य झाल्यास हे तिसरं वर्ष असेल ज्यामध्ये बँकेकडून केंद्र सरकारला अंतरीम लाभांश मिळेल. यात्र यंदाही याविषयावरून रिझर्व्ह बँक आणि केंद्र सरकारमध्ये मतभेद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उर्जित पटेल रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असताना पैसे केंद्राला देण्यावरून वाद निर्माण झाला होता. या वादाच्या पार्श्वभूमीवर उर्जित पटेल यांनी राजीनामा दिला होता. चालू आर्थिक वर्षात सरकारला 19.6 लाख कोटी रुपयांची महसूल तूट सहन करावी लागत आहे. याचं मुख्य कारण हे आर्थिक मंदीसोबतच कॉर्पोरट करामध्ये दिलेली सवलत हे देखील आहे. जीएसटी आणि इतर करांच्या माध्यमातून मिळणारं उत्पन्नही अपेक्षेप्रमाणे जमा झालेलं नाहीये.

आपली प्रतिक्रिया द्या