मोदींचे गुजरात मॉडेल बुडाले; 18 जिल्हे पाण्याखाली; 39 जणांचा मृत्यू, 41 हजार जणांना हलवले

मुसळधार पावसात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशभरात प्रचंड गाजावाजा करण्यात आलेले गुजरात मॉडेल अक्षरशः बुडाले. इमारती, रस्ते, वाहने बुडाली. तब्बल 939 रस्ते पूर्णपणे बंद असून 18 जिल्हे पाण्याखाली गेले आहेत. अनेक ठिकाणी तब्बल 10 ते 12 फुटांपर्यंत पाणी साचले. लाखो लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. पुरामुळे आतापर्यंत 39 जणांचा मृत्यू झाला असून 41 हजार 678 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. मुंबईत गुडघाभर पाणी साचले तरी बोंबाबोंब करणाऱया भाजपची मान गुजरात मॉडेलचा फज्जा उडाल्यामुळे मोडली असून पंतप्रधान आणि गुजरातचे मुख्यमंत्री आता गुजरात मॉडेल वाचवण्यासाठी धडपडत असल्याचे चित्र आहे.

गुजरातमध्ये पुढचे पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला असून पूरग्रस्त भागातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे आव्हान केंद्र, राज्य सरकार आणि एनडीआरएफसह बचावकार्य करणाऱ्या विविध यंत्रणांसमोर आहे. पुरातून वाचण्यासाठी अनेक भागात लोकांनी घराच्या छतावर आसरा घेतला. वडोदऱ्यातील हजारो नागरिकांना एनडीआरएफच्या पथकाकडून सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. तसेच एसडीआरएफची अनेक पथके ठिकठिकाणी बचावकार्य करत आहेत.

122 धरणांच्या परिसरातील गावांना इशारा
राज्यातील 140 जलाशये पूर्ण भरली असून 24 नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे आसपासच्या परिसराला धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. पुराचे पाणी साचल्यामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून अनेक ठिकाणी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. राज्यातील 206 धरणांपैकी 122 धरणांच्या परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

या ठिकाणी पुराचा फटका
गुजरातच्या 18 जिह्यांमध्ये प्रचंड हाहाकार असून कच्छ, द्वारका, जामनगर, अहमदाबाद, पंचमहल, भरूच. दांग, गांधीनगर, खेडा, महीसागर, दाहोड, मोरबी, सुरेंद्रनगर, वडोदरा जुनागढ, राजकोट, बोटाद, गीरसोमनाथ, अमरेली आणि भावनगर या ठिकाणी पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे.

सरासरीच्या 105 टक्के पाऊस
गुजरातमध्ये यावेळी सरासरीच्या तब्बल 105 टक्के पाऊस झाला. सौराष्ट्र विभागातील देवभूमी द्वारका, जामनगर, राजकोट आणि पोरबंदर या जिल्ह्यांमध्ये सायंकाळी 6 ते 12 तासांच्या कालावधीत 200 मिमी पाऊस झाला, तर द्वारका जिह्यातील भानवड तालुक्यात याच कालावधीत 185 मिमी पाऊस झाला.

पंतप्रधानांकडून मुख्यमंत्र्यांना मदतीचे आश्वासन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी फोनवरून संवाद साधत राज्यातील अन्नधान्याच्या साठय़ाबाबत माहिती घेतली. तसेच पूरस्थितीचा आढावाही घेतला. या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी केंद्र सरकार पूर्ण ताकदीनिशी गुजरातच्या पाठीशी आहे, असे आश्वासनही पंतप्रधानांनी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना दिले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी एनडीआरएफची आणखी पाच पथके बचाव कार्यासाठी तैनात केली आहेत. तसेच लष्कराचीही मदत घेतली जात आहे. बचावकार्यात लष्कराच्या सहा तुकडय़ा गुंतल्या आहेत.

छतावर दिसली 10 फुटांची मगर
पावसामुळे वडोदऱयातील अकोटा स्टेडियम परिसर पाण्याखाली गेला. पाणी इतके भरले की, घराच्या छतावर एक 10 फुटांची मगर दिसली. सोशल मीडियात या मगरीचे पह्टो प्रचंड व्हायरल झाले. काही ठिकाणी मगर मुक्तपणे विहार करतानाही दिसली. एका श्वानाला तिने भक्ष्य बनवल्याचे फोटोही व्हायरल झाले आहे. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर परिसरात एकच घबराट पसरली. एनडीआरएफने छतावर अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी नेले. त्यानंतर वन विभागाला पाचारण करून या मगरीला पकडण्यात आले. दरम्यान, वडोदरा शहरातून वाहणाऱ्या विश्वामित्री नदीत अंदाजे 300 मगरी असून वन विभागाने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.