
श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे आज श्रावणी गुरुवार आणि श्रावण नारळी पौर्णिमा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. दरम्यान येथील मुख्य श्री दत्त मंदिर पूर्ण पाण्याखाली गेले असून श्रींची उत्सवमूर्ती भक्तांच्या दर्शनासाठी मुख्य मंदिराच्या वरील बाजूस असणाऱ्या नारायण स्वामी मंदिरात ठेवण्यात आली आहे. येथेच सर्व पूजा अभिषेक नित्यक्रम सुरू आहेत. दरम्यान आज श्रावणी गुरुवार आणि नारळी पौर्णिमेनिमित्त महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक आदी राज्यांतून भाविक दर्शनासाठी आले होते.
नारळी पौर्णिमेनिमित्त पहाटेपासूनच भाविकांनी येथील दत्त मंदिरात हजेरी लावण्यास सुरुवात केली. दोन वर्षे कोरोना आणि महापुरामुळे नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी करता आली नाही. दरम्यान यंदा सर्वच उत्सव उत्साहात साजरे होत आहेत. त्या अनुषंगाने आज दत्तभक्त श्री क्षेत्र नृसिंहवाडीत श्री दत्त दर्शनासाठी हजेरी लावली गेली. चार दिवस पावसाची रिप रिप सुरूच आहे.
त्यातही भाविकांनी दत्त दर्शन घेतले. श्रावण पौर्णिमेनिमित्त श्री दत्त मंदिरात पहाटे पाच वाजता काकड आरती व षोडशोपचार पूजा, सकाळी आठ वाजल्यापासून पंचामृत अभिषेक, श्रींची महापूजा. पवमान पंचसुक्तांचे पठण, रात्रो धूप, दीप, आरती इंदुकोटीस्तोत्र पठण, करुणात्रिपदी आणि शेजारती असे कार्यक्रम झाले. अनेक भाविकांनी येथील कृष्णा-पंचगंगा नदीचे यथाविधी पूजन केले व मनोभावे नदीला नारळ अर्पण केला. येथील दत्त देव संस्थान मार्फत पत्र्याचा मांडव, दर्शनरांग, मुखदर्शन, स्वयंसेवक, रक्षारक्षक,ध्वनीक्षेपक यंत्रणा आदी व्यवस्था केली होती. गर्दीचे नियोजन करण्यासाठी दत्त देव संस्थानचे कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन, पोलीस खात्यामार्फत चोख व्यवस्था आणि एस.टी. खात्यामार्फत जादा गाड्यांची सोय करण्यात आली होती.