आपल्यावर काही आभाळ कोसळलेले नाही. राज्यात केवळ दोन लाख मते कमी पडली आहेत. याउलट आपण मुंबईत दोन लाख अधिकची मते घेतली आहेत. पण संविधान बदलणार हा नरेटिव्ह सेट करण्यात विरोधक यशस्वी ठरले. आता जनतेपर्यंत विरोधकांच्या नरेटिव्हची पोलखोल करू, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी सांगितले.
दादर येथील वसंत स्मृती कार्यालयात भाजपची बैठक झाली. यावेळी मार्गदर्शन करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, लोकसभा निवडणुकीत संविधान बदलणार हा नरेटिव्ह सेट करण्यात विरोधक यशस्वी ठरले. महाराष्ट्रात आपण डाऊन झालो आहोत, पण आऊट नाही, असा दावा त्यांनी केला. या निवडणुकीत आपण 23 जागांवरून 9 जागांवर आलो. 13 जागा अशा आहेत ज्या केवळ 4 टक्के मतांपेक्षा कमी मतांनी हरलो. संपूर्ण ‘इंडिया’ आघाडीला जेवढय़ा जागा मिळाल्या त्याहून जास्त जागा एकटय़ा भाजपला मिळाल्या आहेत असा दावा त्यांनी केला.