भाजप आमदाराची नरसी नामदेव विश्वस्ताला बेदम मारहाण, हिशोब विचारल्यानं संतापले

tanaji-mutkule

भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे आणि त्यांच्या समर्थकांनी हिंगोलीच्या नरसी नामदेव संस्थेच्या विश्वस्ताला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. मारहाण झालेल्या विश्वस्ताचं नाव अंबादास गाडे असल्यांचं सांगितलं जात आहे. गाडे यांच्यावर आता हिंगोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून पाठीमध्ये खुर्च्यांनी मारहाण केल्यानं त्यांना गंभीर दुखापत झाल्याचं सांगण्यात आलं आहे.

नरसी नामदेव संस्थासमितीच्या कामांचा हिशोब घेण्यासाठी बैठक घेण्यात आली होती. 18 सप्टेंबर रोजी ही बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत हिशोब विचारण्यात आला. नरसी नामदेव येथील संस्थेचे विश्वस्त अंबादास गाडे यांना भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी बेदम मारल्याचा आरोप करण्यात आला आहे. संस्थेचे विश्वस्त गाडे यांनी हा आरोप केला आहे.

संत नामदेव यांच्या जन्म गावी नरसी नामदेव येथे नामदेव महाराजांच्या मंदिराचा जिर्णोद्धाराचं काम सध्या वेगानं सुरू आहे. या कामाचा आढावा घेण्यासाठी आणि जीर्णोद्धार समितीचा हिशोब मागण्यासाठी विश्वस्त मंडळीच्या वतीनं या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत भाजप आमदार तानाजी मुटकुळे हे त्यांच्या समर्थकांसह उपस्थित होते. यावेळी विश्वस्त मंडळींनी जिर्णोद्धार समितीच्या कामाचा हिशोब मागितला. त्यानंतर आमदार चांगलेच संतापले. हिशोब मागणाऱ्या विश्वस्तालाच त्यांनी बेदम मारहाण केली, असं एबीपी माझाच्या वृत्तात सांगण्यात आलं आहे.