भांडण पृथ्वीवरचे… सूड घेतला अवकाशात

1038

पृथ्वीवर झालेल्या भांडणामुळे एखाद्या व्यक्तीकडून अवकाशातही गुन्हा घडू शकतो अशी विचित्र घटना अमेरिकेत घडली आहे. ‘नासाया अमेरिकन अंतराळ संशोधन केंद्राची प्रमुख महिला अंतराळवीर ऐनी मॅक्लेन हिच्याविरुद्ध तिच्या घटस्फोटित पतीने तक्रार केली आहे. ऐनीने अंतराळातून आपले बँक खाते हॅक केल्याचा त्याचा दावा आहे. तो खरा ठरला तर हा अंतराळात घडलेला पहिला गुन्हा ठरणार आहे आणि त्या गुह्यासाठी पृथ्वीवरील म्हणजेच अमेरिकन कायद्यानुसार शिक्षा होईल.

अमेरिकन हवाईदलाच्या हेरखात्याचा माजी अधिकारी सुमेर वोर्डन याच्याबरोबर ऐनी मॅक्लेन हिचे 2014 मध्ये लग्न झाले होते. दोघांना एक मुलगा आहे. चार वर्षांनंतर मतभेद झाल्याने 2018 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर 3 डिसेंबर 2018 रोजी ऐनीचीनासाच्या अंतराळ मोहिमेसाठी निवड झाली. सहा महिन्यांसाठी तिला आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रात पाठवण्यात आले होते. 24 जून 2019 रोजी ती मोहिमेवरून परतली.

मार्चमध्ये बँक खात्यातून झाली देवाणघेवाण

अंतराळात असताना ऐनीने आपल्या बँक खात्यातून देवाणघेवाण केल्याची सुमेरची तक्रार आहे. मार्च महिन्यात त्याला हे समजले होते. फेडरल ट्रेड कमिशनमध्ये सुमेरने याची तक्रार केली. परंतु नासाने तत्काळी त्याबद्दल चौकशी केली नाही. कारण अंतराळातील स्पेसवॉकसाठी ज्या दोन महिलांची निवड झाली होती त्यात ऐनीचेही नाव होते. परंतु काही आरोपांमुळे तो स्पेसवॉक रद्द केला गेला. दरम्यान बँकेने केलेल्या चौकशीत नासाच्या कॉम्प्युटरद्वारे सुमेरचे बँक खाते हॅक करण्यात आल्याचे उघड झाले.

सावध पवित्रा

अंतराळात हा गुन्हा घडला असल्याने त्याची चौकशी फेडरल ट्रेड कमिशन किंवा पोलिसांच्या आवाक्याबाहेरची होती. त्यामुळेनासाकडे चौकशी सोपवली गेली. परंतु नासाने ऐनीच्या खासगी आयुष्याबद्दल काहीच न बोलता तिच्या कामाची मात्र प्रशंसा केली. कारण ऐनी ही केवळ अंतराळवीर नसून अमेरिकन हवाईदलाची लेफ्टनंट कर्नल आहे आणि तिने इराक युद्धामधील मोहिमांमध्ये भाग घेतला होता.

मला फक्त मुलाची काळजी होती

खात्यावरून कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार झाला नसल्याचे ऐनीने आपल्या वकिलामार्फत सांगितले आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती कशी आहे, वॉर्डनकडे माझ्या मुलाचा सांभाळ करण्यासाठी पैसे आहेत की नाही हे आपण पाहत होतो असे तिने म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या