नासाची नोकरी सोडून नाशिकला परतले, शेतकऱयांसाठी बनवले अत्याधुनिक हवामान केंद्र

निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतीला बसतो. त्यामुळे शेतकऱयांचे मोठे नुकसान होते. हवामानाची पूर्वसूचना मिळाल्यास हे नुकसान कमी करता येते. याचाच विचार करून अमेरिकेच्या नासा संस्थेतून हिंदुस्थानात परतेलेले नाशिकचे डॉ. पराग नार्वेकर यांनी शेतकऱयांना परवडतील, असे अत्याधुनिक सेन्सर विकसित केले आहेत. हे स्वयंचलित हवामान केंद्र असून त्यामुळे शेतकऱयांना माती, पाणी, पीक व्यवस्थापन, पीक विमा यांच्या अनुषंगाने हवामानाच्या विविध निकषांचा डेटा उपलब्ध होईल.

पराग नार्वेकर यांनी आयआयटी मुंबई येथे शिक्षण घेतले असून त्यांनी नासा संस्थेत 12 वर्षे काम केले आहे. तिथे त्यांनी उपग्रह आणि शेतीतील सेन्सर आधारित तंत्रज्ञान यावर संशोधन केले आहे. आता ते हिंदुस्थानातील शेतकऱयांसाठी काम करत आहेत. नार्वेकर यांच्यासोबत सह्याद्री फार्मने शेतकऱयांना परवडतील, असे सेन्सर विकसित केले. जे सेन्सर आधी दीड लाख रुपयांना मिळायचे ते आता अवघ्या 10 हजार रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहेत.

याविषयी पराग नार्वेकर म्हणाले, हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर पीक उत्पादन वाढवण्याचे प्रगत कृषी तंत्रज्ञान अमेरिका, युरोपमध्ये या देशांमध्ये आहे. आपल्या देशात असे तंत्रज्ञान खूप कमी आहे. नासामध्ये काम केल्यानंतर आपल्या देशातली लोकांसाठी काहीतरी करावे अशी इच्छा होती. शेतकऱयांना महागडे तंत्रज्ञान परवडू शकत नाही. म्हणून परवडणारे तंत्रज्ञान विकसित केले असून गेल्या वर्षीपासून ते कार्यान्वित झाले आहे.

सह्याद्री फार्मचे वरिष्ठ व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे म्हणाले, शेतकऱयांना परवडणाऱया किमतीत अचूक डेटा देईल असे सेन्सर आम्हाला तयार करायचे होते. आम्ही तीन वर्षांपासून यावर काम करत आहोत. जुने सेन्सर गावपातळीवर बसवावे लागायचे. नवे सेन्सर शेतकऱयांच्या शेतामध्ये बसवता येईल.

n अत्याधुनिक हवामान केंद्रामुळे वाऱयाचा वेग, दिशा, सौरकिरणे, बाष्पीभवन, पाऊस, ओलावा, तापमान आदींची माहिती मिळते.
n पिकांच्या मुळांना पाण्याची गरज भासली किंवा बागेत एखाद्या रोगाचा प्रादुर्भाव होणार असेल तर त्याची पूर्वसूचना मिळते. सिंचनासाठी योग्य वेळ कोणती हे शेतकऱयांना समजू शकते.
n उत्पादन खर्च कमी करण्यासह प्रभावी व अचूक व्यवस्थापन व गुणवत्तापूर्ण पीक घेता येते.

आपली प्रतिक्रिया द्या