चंद्र पुन्हा कवेत घेण्याची नासाची मोहीम, प्रथमच महिला अंतराळवीर धाडण्याची घोषणा

अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्था ’नासा’ने सुमारे 52 वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर चंद्राला पुन्हा कवेत घेण्याची घोषणा आपले आर्टेमिस मिशन जाहीर करताना केली आहे. 1972 च्या अपोलो चांद्र मोहिमेनंतर पुन्हा 2024 मध्ये मानवाला चंद्रावर पाठवण्याचा आणि प्रथमच चंद्रावर महिला अंतराळवीर उतरवण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प राबवण्याचे नासाने ठरवले आहे. चंद्रावरील मानवी मोहिमांसोबतच चंद्राच्या पृष्ठभागाच्या उत्खननाचीही योजना नासाच्या कार्यक्रमात समाविष्ट आहे.

नासा चंद्रावरील मानवी मोहिमांवर पुन्हा लक्ष केंद्रित करणार असून दर 4 वर्षांनी अशा मानवी चांद्र मोहीम आयोजित करण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे सांगून नासाचे प्रशासक जिम ब्रिडेनस्टाईन म्हणाले, नव्या आर्टेमिस मोहिमेतील मानवी मिशनसाठी आम्ही 48 प्रशिक्षित अंतराळवीरांनी टीम तयार केली आहे. दर चार वर्षांनी मानवी चांद्रमोहिमेचे आयोजन करीत चंद्रावरील परिस्थितीचा प्रत्यक्ष शास्त्राrय आणि भौगोलिक स्थितीचा अभ्यास नासा करणार आहे. नव्या 11 अंतराळवीरांत हिंदुस्थानी वंशाचे राजा चारी यांचाही समावेश आहे. या सर्व भावी अंतराळवीरांनी 2 वर्षांचे प्राथमिक प्रशिक्षण पूर्ण करीत अंतराळ संशोधनातील पदवी मिळवली आहे. आर्टेमिस मोहिमेतील मानवी मोहिमांत आम्ही प्रथमच महिलेला चंद्रावर उतरवून नवा इतिहास घडवणार आहोत असे ब्रिडेनस्टाईन यांनी स्पष्ट केले. या चांद्र मोहिमांसोबतच नासा मंगळावरही 2030 पर्यंत मानवी मंगळ मोहीम आखणार असल्याचेही नासाने घोषित केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या