इस्रोपुढे नासाचं लोटांगण…

39

सामना ऑनलाईन । वॉशिंग्टन

दोन देशांमधले परस्परसंबंध कितीही गंभीर स्वरुपाचे असले तरीही कधीकधी त्या संबंधांमध्ये अनपेक्षित आणि रंगतदार गोष्टी घडतात. आम्ही सांगतोय ते हिंदुस्थान आणि अमेरिका या दोन्ही देशांबद्दल. त्याचं झालं असं की, १९९२ मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो) वर बंदी घातली होती. इतकंच नाही तर त्या काळात अमेरिका रशियावर बंधनं लादून त्यांनाही इस्रोशी संबंध ठेवण्यास मनाई केली होती. अमेरिकेला कसंही करून हिंदुस्थानला मिसाईल तंत्रज्ञान विकसित करण्यापासून रोखायचं होतं.

पण, हिंदुस्थानने भगीरथप्रयत्नांनी जीएसएलव्ही बनवण्यात यश प्राप्त केलं. यात वापरलं गेलेलं क्रायोजेनिक इंजिन हे संपूर्ण हिंदुस्थानी बनावटीचं आहे. १९९२ नंतरच्या दोन दशकांनंतर हिंदुस्थानने याच जीएसएलव्ही तंत्राच्या साहाय्याने अमेरिकेला नमतं घ्यायला भाग पाडलं आहे. ज्या संस्थेचा अवकाश जगात बोलबाला होता, ती नासा ही संस्था आता इस्रोपुढे लोटांगण घालत आहे. ज्याच्या निर्मितीपासून हिंदुस्थानला रोखण्यात आलं, त्याच जीएसएलव्ही क्षेपणास्त्राच्या माध्यमातून आता भविष्यात नासा अवकाशात निसार नावाचा कृत्रिम उपग्रह पाठवणार आहे. २०२१ सालात या क्षेपणास्त्राला अवकाशात सोडण्यात येईल. यासंबंधी दोन्हीही देशांची बोलणी झाली असून अमेरिका आणि हिंदुस्थानच्या संयुक्त विद्यमाने हा प्रयोग होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या