आता झेप सूर्याकडे!

75

आभाळमाया –  वैश्विक  n  [email protected]

आपल्या ग्रहमालेचा आणि पृथ्वीवरच्या जीवसृष्टीचा जीवनदाता सूर्य. तेजोनिधी लोहगोल नव्हे, पण वायुगोल. या तेजस्वी ताऱ्याच्या ऊर्जेवर आपण सारे अवलंबून. सुमारे पंधरा कोटी किलोमीटर अंतरावर असलेल्या सूर्याचे किरण पृथ्वीपर्यंत पोहोचायला सवा आठ मिनिटं लागतात. त्याच्या प्रकाशनिर्मितीची गोष्टही विलक्षण. अशा सूर्याचं अंतरंग वैज्ञानिकांना ठाऊक आहे ते सैद्धांतिकदृष्टय़ा; परंतु त्याच्या अगदी जवळ जाऊन त्याचा थेट वेध घेण्याचा मनसुबा आता ‘नासा’ने जाहीर केला आहे.

२०१८ मध्ये म्हणजे पुढच्या वर्षी नासाचे रोबोटिक स्पेसक्राफ्ट सूर्याच्या दिशेने निघेल आणि सूर्यापासून साठ लाख किलोमीटर अंतरावरून सूर्याच्या पृष्ठभागाचे निरीक्षण करील. चांद्रविजयानंतर अनेक ग्रहांवर मानवनिर्मित अवकाशयाने सोडण्यात आली. मंगळासारख्या ग्रहाकडे विशेष लक्ष दिले गेल्याने तिथे संभाव्य वसाहतीविषयी चर्चा होऊ लागली. बरोबर १०० वर्षांनी म्हणजे २११७ मध्ये मंगळावर मानवी वसाहत निर्माण करण्याचं उद्दिष्ट अरब राष्ट्रांनीही जाहीर केलं आहे. आतापर्यंत सौरमालेत भ्रमंती करण्यात मोजकेच देश आहेत. संयुक्त अरब अमिरातीने प्रथमच अवकाश कार्यक्रमातील हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प जाहीर केला. पृथ्वीपलीकडच्या ग्रहावर वस्ती करण्याचं स्वप्न माणूस अनेक वर्षे पाहत आहे. बऱ्याच वेळा त्यादृष्टीने प्रयत्नशील आहेत, परंतु आम्हीच ते प्रत्यक्षात उतरवू असं अमिरातीच्या अध्यक्षांचं म्हणणं आहे. त्यासाठी त्यांनी तब्बल शतकभराचं नियोजन असलेला अवकाश-प्रकल्प हाती घ्यायचं ठरवलं आहे. त्यासाठी अमिरातीने आताच साडेचार अब्ज डॉलरची तरतूद केली आहे. ‘युरोपीयन स्पेस एन्जसी’प्रमाणे ‘पॅन अरब स्पेस एजन्सी’तर्फे युरोपीय देशांच्या सहकार्याने हा संभाव्य प्रकल्प यशस्वी केला जाईल.

याबाबतीतलं पहिलं पाऊल म्हणून अमिरातीतर्फे २०२१ मध्ये ‘मार्स होप’ हे यान मंगळाकडे पाठवलं जाईल. येत्या शतकात मंगळावर अधिक वेगवान याने कशी सोडता येतील आणि ती अधिक सुरक्षित कशी असतील याविषयी संशोधन करण्यात येणार आहे. आखाती देशातील तसेच जगातील नामवंत शास्त्रज्ञ, तंत्रज्ञांची मदत या प्रकल्पासाठी घेतली जाणार असून संयुक्त अरब अमिरातीमधील तरुणांना हे वैज्ञानिक साहस आकर्षित करील, असा विश्वास तिथल्या राज्यकर्त्यांना वाटतो.

आखाती देशामध्ये मंगळ मोहिमेची तयारी सुरू असताना अमेरिकेच्या ‘नासा’ने ग्रहांपलीकडचा विचार करून सूर्य नावाच्या ताऱ्याचा अभ्यास करण्याची मोहीम हाती घ्यायचं ठरवलं आहे.

अर्थात धगधगत्या वायुरूप सूर्याचा जाळ सहन करत त्यावर कोणतेच यान ‘उतरू’ शकणार नाही. सूर्यावर आदळणारे धूमकेतूही त्यात विलीन होतात तर छोट्याशा यानाची काय कथा! या आगामी सौरयानाचा उद्देश सूर्याचं खूप जवळून निरीक्षण करून त्याच्या ‘फोटोस्फिअर’चा म्हणजे पृष्ठभागाचा सखोल अभ्यास केला जाईल. सूर्याचा प्रभामंडळाच्या (करोना) तुलनेत त्याच्या पृष्ठभागाचं तापमान काहीसं कमी म्हणजे साडेपाच हजार अंश सेल्सिअस असतं. मात्र त्याच्या वातावरणाचं तापमान दोन दशलक्ष अंशांपर्यंत जातं ते कशामुळे, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं या सौरयान प्रकल्पाला मिळवता येतील. माणसाने आता आपल्या सूर्यमालेचा धांडोळा घेण्याचा चंग बांधला आहे. मात्र आपल्या पृथ्वीवर जेवढं शांततामय वातावरण असेल आणि प्रदूषणमुक्त जीवन असेल तेवढं वैज्ञानिक संशोधनाला पोषक ठरेल. ‘आभाळमाये’बरोबरच आभाळातच असलेल्या आपल्या पृथ्वीवरही खऱ्या अर्थाने माया करण्याची गरज आहे. सध्या उन्हाळा होऊ लागलाय. सूर्य पृथ्वीच्या उत्तर गोलार्धावर २३ मार्चपासून तळपायला लागेल. २१ जूनला तो उज्जैनवर असेल. याच काळात आपल्याकडे पाऊसही पडतो. तोपर्यंत चार महिने सूर्याच्या प्रखरतेचा अनुभव घ्यावा लागणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या