नाशिकमध्ये 122 शेतकऱ्यांकडून मक्याची समूह लागवड, 296 एकरांत अभिनव प्रयोग

279

मालेगाव तालुक्यातील टेहरे येथे 122 शेतकऱयांनी एकत्रित येत समूह पद्धतीने खत-बियाणे खरेदी करीत एकाच वेळी 296 एकर क्षेत्रावर मका लागवड केली. उत्पादन खर्च कमी करीत त्यांनी उत्पन्नवाढीचे सुयोग्य नियोजन केल्याबद्दल कृषी सचिव एकनाथ डवले यांनी शुक्रवारी बांधावर जाऊन शेतकऱयांशी संवाद साधत त्यांचे कौतुक केले. अशा प्रयोगांची आवश्यकता असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

कृषीमंत्री दादा भुसे यांच्या संकल्पनेतून समूह आधारित कृषी विस्तार कार्यक्रम राबवला जात आहे. कृषी संजीवनी सप्ताहाचे औचित्य साधून कृषी सचिव डवले यांनी शुक्रवारी टेहरे येथे शेतकऱयांची बांधावर जाऊन भेट घेतली. उत्पादकता, गुणवत्ता आणि उत्पन्नवाढ या त्रिसूत्रीच्या आधारे शेतकऱयांच्या बांधावर जाऊन समस्या निवारणाचा उपक्रम कृषी विभाग राबवत आहे. या माध्यमातून शेतकऱयांच्या सक्षमीकरणाला मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अद्ययावत तंत्रज्ञान शेतकऱयांपर्यंत पोहचविण्याच्या अधिकाऱयांना सूचना दिल्या. त्यांच्या हस्ते सायने व पाडळदे येथे 60 शेतकऱयांना खतांचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ, उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे, तालुका कृषी अधिकारी अशोक पवार, डाळिंब संशोधन केंद्राचे डॉ. सचिन हिरे उपस्थित होते.

सवाचार लाखांची बचत
टेहरे येथे 122 शेतकऱयांना खत-बियाण्यांच्या कंपन्यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या सीएसआरमधून सवलतीच्या दरात खते-बियाणे आदींचा पुरवठा केला. त्यामुळे उत्पादन खर्चात सवाचार लाखांची बचत झाली. तसेच या शेतकऱयांना मका पिकावरील लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी जैविक उपाय म्हणून कामगंध सापळ्याचे वाटप करण्यात आले आहे.

अकरा गावांमध्ये समूह शेती
मालेगाव तालुक्यातील अकरा गावांमधील 773 शेतकऱयांनी एपूण 1 हजार 471 एकरवर समूह आधारित पद्धतीने खते-बियाणे खरेदी करीत एकाच वेळी पीक लागवड केली आहे. त्यात टेहरे, चिंचावड, नांदगाव बुद्रुक, खापुर्डी, अजंग, चिखलओहळ, वडगाव, सिताणे, मथुरपाडे, भिलकोट व पाडळदे या गावांचा समावेश आहे.

कृत्रिम टंचाई निर्माण केल्यास कारवाई
खते व बियाणांची साठेबाजी करून कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱयांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश सचिव एकनाथ डवले यांनी या वेळी दिले.

आपली प्रतिक्रिया द्या