नाशिक : 6 नगरपंचायत, 38 ग्रामपंचायतींसाठी मतदान शांततेत

voter-line-maharashtra

नाशिक जिल्ह्यात 6 नगरपंचायतींच्या 87 जागांच्या निवडणुकीसाठी आणि 38 ग्रामपंचायतींच्या 49 जागांच्या पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी शांततेत मतदान झाले. बहुतांश ठिकाणी सकाळपासूनच मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत नगरपंचायतींसाठी एकूण 64 टक्के, तर ग्रामपंचायतींसाठी 57 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

पेठ, सुरगाणा, कळवण, देवळा, निफाड, दिंडोरी या सहा नगरपंचायतींच्या 87 जागांसाठी 293 उमेदवार रिंगणात आहेत. मंगळवारी येथील 105 मतदान केंद्रांवर सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडली. याकरिता 720 अधिकारी, कर्मचारी नियुक्त होते. सर्वच केंद्रांवर कडक पोलीस बंदोबस्त तैनात होता. दुपारी 3.30 वाजेपर्यंत नगरपंचायतींसाठी एकूण 34 हजार 436 मतदारांनी मतदान केले. पेठ येथे साडेतीन वाजेपर्यंत 3304 (71 टक्के) मतदारांनी मतदान केले. सुरगाणा- 2729 (65 टक्के), कळवण- 7700 (62), देवळा- 4520 (71), निफाड- 7634 (54), दिंडोरी- 8549 (70) इतक्या मतदारांनी उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंदीस्त केले. सुरगाणा, पेठ वगळता इतर नगरपंचायतींच्या 19 ओबीसी जागांसाठी 18 जानेवारीला मतदान होईल, त्यानंतर 19 जानेवारीला संपूर्ण मतमोजणी होईल.

जिल्ह्यात सटाणा, मालेगाव, नांदगाव, निफाड, इगतपुरी, दिंडोरी, नाशिक, येवला, देवळा, कळवण, चांदवड, सिन्नर, त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमधील 38 ग्रामपंचायतींच्या 49 जागांच्या पोटनिवडणुकीसाठी देखील मंगळवारी मतदान पार पडले. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत 24 हजार 716 पैकी 14 हजार 736 मतदारांनी मतदान केले, ही टक्केवारी 57 इतकी आहे.