94व्या साहित्य संमेलनाध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकर

यंदा नाशिकला होणाऱया 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रख्यात खगोल शास्त्र्ाज्ञ व विज्ञान कथालेखक डॉ. जयंत नारळीकर यांची निवड करण्यात आली. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष काैतिकराव ठाले-पाटील यांनी नाशिक येथे रविवारी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.

महामंडळाच्या पदाधिकाऱयांची काल शनिवारी कार्यक्रम पत्रिकेबाबत चर्चा झाली. आज रविवारी संमेलनाध्यक्षपद निवडीची बैठक झाली. अध्यक्षपदासाठी विदर्भ साहित्य संघाकडून आलेले ज्येष्ठ साहित्यिक भारत ससाणे, मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे यांचेही नाव चर्चेत होते. संमेलनाची नाशिकमधील आयोजक संस्था लोकहितवादी मंडळाने नाशिकचे प्रख्यात लेखक मनोहर शहाणे यांचे नाव सुचविले होते. यावरही चर्चा झाली. डॉ. जयंत नारळीकर यांचे नाव निश्चित करण्यात आले, अशी माहिती ठाले-पाटील यांनी दिली.

डॉ. नारळीकर यांना पद्मभूषण आणि पद्मविभूषण या पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले आहे. त्यांच्या ‘यक्षांची देणगी’ या पहिल्याच पुस्तकाला राज्य शासनाचा पुरस्कार मिळालेला आहे. ‘चार नगरांतले माझे विश्व’ या मराठी आत्मचरित्राला अमेरिकेतील फाऊंडेशनतर्फे साहित्यविषयक जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. याच आत्मचरित्राला दिल्लीच्या साहित्य अकादमीचाही पुरस्कार प्राप्त झालेला आहे. महामंडळाच्या पुणे विभागीय कार्यालयाने डॉ. नारळीकर यांच्या नावाचा प्रस्ताव पाठविला होता.

मराठी भाषा अधिक समृद्ध करण्यासाठी कटिबद्ध

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड हा माझ्यासाठी मोठा सन्मान असून, त्यासाठी आपण योग्य ठरण्यासाठी प्रयत्न करणार आहे. अलीकडच्या काळात मराठी टिकून राहण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. विज्ञान मराठीत आले की भाषा अधिक समृद्ध होईल. माझ्या कार्यकाळात त्यासाठी मी कटिबद्ध असेल. नवोदित लेखकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी प्रयत्न करणार असून, वैज्ञानिक आणि साहित्यिकांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे डॉ. जयंत नारळीकर यांनी सांगितले.

26 मार्चला ग्रंथदिंडी

नाशिकच्या गोखले एज्युकेशन संस्थेच्या प्रांगणात 26 मार्च ते 28 मार्च असे तीन दिवस हे संमेलन होणार आहे. 26 मार्चला कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या निवासस्थानापासून ग्रंथदिंडीने या संमेलनाला सुरुवात होईल, असे ठाले-पाटील यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या