नाशिक : पोलिसांसाठी हक्काचे कोविड केअर सेंटर उभारणार

deepak-pandey

कोविड संक्रमणाच्या काळातही कोविड योद्धे म्हणून पोलीस अधिकारी आणि कर्मचारी रस्त्यावर उतरून दिवसरात्र कार्यरत आहेत. त्यांच्यासह कुटुंबीयांच्या आरोग्यविषयक सुरक्षेला प्राधान्य देत लवकरच हक्काचे कोविड केअर सेंटर उभारण्यात येईल. त्यांच्यासाठी अॅम्ब्युलन्स सेवा उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

पोलीस आयुक्तपदाची शुक्रवारी सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रथमच सोमवारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला, विविध प्रश्नांना उत्तरे दिली. सध्या कोविडच्या पार्श्वभूमीवर अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या आरोग्याची काळजी घेणे, त्यांच्या मनातील कोविडबद्दलची भीती दूर व्हावी ही माझी पहिली जबाबदारी आहे. त्यादृष्टीने प्राधान्याने पोलीस यंत्रणेसाठी हक्काचे कोविड केअर सेंटर उभारले जाईल. याबाबत महापालिका आयुक्तांशीही चर्चा झाली आहे. हे सेंटर शासनमान्य असेल. यात पुरुषांसाठी 60 ते 70, तर महिलांसाठी 30 ते 40 बेडची सुविधा असेल. कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना त्वरित उपचार मिळावे म्हणून अॅम्ब्युलन्स सेवाही मिळेल. त्यासाठी दोन अॅम्ब्युलन्स तयार असून, आणखी चार-पाचची व्यवस्था केली जाणार आहे.
कर्मचार्‍यांना एक व्हॉट्सअॅप क्रमांक उपलब्ध करून दिला जाईल, त्यावर ते आपल्या आरोग्यविषयक समस्या सांगतील, जेणेकरून पुढील उपचार तातडीने देता येतील, असे त्यांनी सांगितले. मुंबईत केलेल्या याप्रकारच्या उपाययोजनांना यश मिळाले, तसेच येथेही कर्मचार्‍यांना या सुविधांचा लाभ मिळावा, पोलीस खाते आणि गृहरक्षक दलातील कुणाचाही कोविडमुळे मृत्यू होवू नये हेच लक्ष्य आहे. त्याचबरोबर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून सर्वतोपरी प्रयत्नशील राहीन. गुन्हेगारीवर वचक ठेवला जाईल, असेही त्यांनी सांगितले. कर्मचारी आणि वाहतुकीच्या समस्या सोडविण्याचीही त्यांनी ग्वाही दिली. गेल्या दोन दिवसात शहरातील विविध पोलीस ठाण्यांना भेटी देवून कर्मचार्‍यांचे मनोबल उंचावण्यासाठी संवाद साधला, असे त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या