नाशिक जिल्हा रुग्णालयातील दिलासादायी बाब, कोविडबाधित मातांच्या बाळांमध्ये पॉझिटिव्हीटीचे प्रमाण नगण्य

कुटुंबातील सदस्य कोविडबाधित झाला की सगळेच चिंताग्रस्त होतात. त्यात ती गर्भवती महिला असेल तर काळजी अधिकच वाढते. या कठिण काळात दिलासा म्हणजे नाशिक जिल्हा रुग्णालयात गेल्या काही महिन्यात सुमारे 500 कोविडबाधित महिलांची प्रसूती झाली. त्यात नवजात बाळांमध्ये रिपोर्ट पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाणे अवघे 2 ते 3 टक्के होते. महत्त्वाचे म्हणजे त्यांनी लगेचच कोविडवर मात केली आहे.

सगळीकडे कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. लहान मुलांना लागण होण्याचे प्रमाणही या दुसर्‍या लाटेत जास्तच आहे. जिल्हा रुग्णालयात कोरोना काळात तब्बल 400 ते 500 कोविडबाधित महिलांची प्रसूती झाली. प्रसूतीनंतर साधारण 48 ते 72 तासातच त्यांच्या नवजात बाळाची आरटीपीसीआर चाचणी रुग्णालयाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. मात्र, पाचशेपैकी अगदी 2 ते 3 टक्के बाळांनाच कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यापैकी अनेकांमध्ये नंतर कोरोनाची तशी फारशी लक्षणेही नव्हती, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातील बालरोग तज्ञ डॉ. पंकज गाजरे यांनी दिली आहे.

जिल्हा रुग्णालयात 0 ते 12 वयोगटातील सुमारे शंभर कोविडबाधित मुलांवर उपचार करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे ही मुले सिम्टमॅटिक असली तरी दोन ते तीन दिवसात त्यांचा ताप उतरल्याचे दिसून आले. मुलांचे बीसीजी, एमएमआर हे लसीकरण झालेले असते, त्यामुळे त्यांची इम्यून सिस्टीम चांगली काम करते. त्यांना ते चांगले संरक्षण मिळत असावे. या रुग्णालयात आतापर्यंत केवळ एकाच 12 वर्षीय मुलासाठी रेमडेसिवीर इंजेक्शन वापरावे लागले, हा मुलगाही उपचारानंतर बरा होवून घरी परतला आहे.

मुलांची जास्त काळजी घ्या

आपल्याकडे अजूनही लहान मुलांचे कोविड लसीकरण झालेले नाही, त्यामुळे त्यांना संसर्ग होण्याची शक्यता टाळता येत नाही. हे लक्षात घेवून पालकांनी मुलांची जास्तीत जास्त काळजी घेतली पाहिजे.

आपली प्रतिक्रिया द्या