नाशिक : तालुकानिहाय कायमस्वरूपी ऑक्सिजन सेंटर उभारावे- पालकमंत्री छगन भुजबळ

703
chhagan-bhujbal

जिल्ह्यातील तालुकास्तरावर कायमस्वरूपी ऑक्सिजन सेंटर उभारावे. मुबलक ऑक्सिजन बेड उपलब्ध करून द्यावेत, अशा सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.

दिंडोरी येथे दिंडोरी, कळवण, सुरगाणा व पेठ तालुक्यांची कोविड-१९ चा आढावा व उपाययोजनांबाबतची बैठक रविवारी झाली, त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. तालुकानिहाय आपत्ती व्यवस्थापन समित्यांची स्थापना करून कोविडबाबतच्या उपाययोजनांची माहिती देण्यात यावी. कोमॉर्बीड रुग्णांवर औषधोपचार त्वरित करावेत. गावनिहाय तपासणी मोहीम राबविण्यात यावी. उद्योगक्षेत्रात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांचे दररोज स्क्रिनिंग करावे. कामगारांची नियमित आरोग्य तपासणी करून आढळलेल्या रुग्णांची माहिती प्रशासनाला द्यावी, माहिती लपवू नये, आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे ते म्हणाले.

अन्न सुरक्षा योजनेचा लाभ अधिक लोकांना मिळावा म्हणून प्रयत्न सुरू असून, कोविडची परिस्थिती सुधारल्यानंतर प्राधान्याने याचा निर्णय घेण्यात येईल. तालुका रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयात समन्वय राहण्यासाठी कॉल सेंटर अथवा हेल्प लाईनचा उपयोग करावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

तालुकास्तरावरील उपाययोजनांची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिली.

यावेळी विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, खासदार डॉ. भारती पवार, आमदार नितीन पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, जिल्हा कृषी अधिकारी संजीव पडवळ, प्रांत संदीप आहेर, विजयकुमार भांगरे उपस्थित होते.

पाणी नियोजन करा

कमी पर्जन्यमानामुळे जिल्ह्यात सध्या पाणी टंचाईची परिस्थिती आहे. त्यामुळे पाणी नियोजन करण्यात यावे, असे त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या