नाशिक : दुकानात फ्रिजमुळे शॉक लागून बालिकेचा मृत्यू

नाशिकच्या उंटवाडीजवळील जगतापनगर येथे गुरुवारी रात्री मेडिकलमध्ये आईस्क्रीम घेण्यासाठी आलेल्या चारवर्षीय बालिकेचा फ्रिजमुळे वीजेचा धक्का बसल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. या बालिकेच्या अकस्मात मृत्युमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

जगतापनगर येथील विशाल अनिल कुलकर्णी यांची मुलगी ग्रीष्मा (4) हिने गुरुवारी रात्री आईस्क्रीम खाण्याचा हट्ट केला. यामुळे वडील तिला घेवून रात्री नऊच्या सुमारास परिसरातीलच प्रसन्न सोनार यांच्या मेडिकलमध्ये आईस्क्रिम खरेदीसाठी गेले होते. दुकानाबाहेर ठेवलेल्या फ्रिजमुळे वीजेचा धक्का बसून ग्रीष्मा बेशुद्ध होवून कोसळली. वडिलांनी तातडीने तिला उपचारासाठी प्रथम खासगी व नंतर जिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकार्‍यांनी तिला तपासून मृत घोषित केले, अशी माहिती अंबड पोलिसांनी दिली.