विजय बिरारी यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करा, नाशिकमध्ये सराफी व्यावसायिकांचा कडकडीत बंद

सराफी व्यावसायिक विजय बिरारी यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करून हैद्राबाद पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल व्हावा, या मागणीसाठी नाशिक शहरासह जिल्ह्यातील सराफी व्यावसायिकांनी बुधवारी कडकडीत बंद पाळला. निषेध सभेनंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. हैद्राबाद पोलिसांवर गुन्हा दाखल झाल्याशिवाय बिरारी यांच्यावर अंत्यसंस्कार करणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

एका घरफोडीच्या गुन्ह्यातील चोरट्यांकडून सोने खरेदी केल्याच्या संशयावरून तेलंगणा राज्यातील सायबराबाद पोलीस आयुक्तालयाच्या पथकाने नाशिकच्या शासकीय विश्रामगृहात मंगळवारी विजय बिरारी यांना तपासासाठी आणले होते. दुपारी दोनच्या सुमारास त्यांनी शिवनेरी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेवून आत्महत्या केली. या पार्श्वभूमीवर दि नाशिक सराफ असोसिएशनने आज सकाळी सराफ बाजारात निषेध सभा घेतली. त्यानंतर मेनरोड, एम.जी.रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला. शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांची भेट घेवून निवेदन दिले. या घटनेचे गांभीर्य ओळखून त्वरित हैद्राबादच्या पोलिसांवर 302 प्रमाणे गुन्हा दाखल करावा, त्यांच्या ताब्यात असलेल्या दोन स्थानिक कारागिरांना त्वरित सोडण्यात यावे, बिरारी यांच्या दुकानातून जप्त केलेले सोने, रोकड, चाव्या व इतर ऐवज त्यांच्या कुटुंबीयांकडे त्वरित सोपवावा, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी संघटनेचे अध्यक्ष चेतन राजापूरकर, पदाधिकारी, सराफी व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नाशिक शहरासह जिल्ह्यातील सर्व सराफांनी आज दिवसभर दुकाने बंद ठेवली होती.

सीआयडी चौकशी सुरू
सराफी व्यावसायिक विजय बिरारी यांच्या मृत्यू प्रकरणाची सीआयडी चौकशी सुरू झाली आहे. हैद्राबादच्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाचे जाबजबाब घेण्यात येत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या