नाशिकमध्ये भीषण अपघातात पाच ठार

सामना प्रतिनिधी, नाशिक

नाशिकरोड येथे रविवारी रात्री कार झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात पाचजणांचा मृत्यू झाला, त्यात रिपाईच्या महिला पदाधिकारी प्रीती भालेराव यांचा समावेश आहे, तर एक तरुण गंभीर जखमी आहे.

नाशिक-पुणे रस्त्यावर शिखरेवाडी परिसरातील अंधशाळा बसथांब्याजवळ रात्री पावणेबारा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. नाशिकरोडहून नाशिक शहराच्या दिशेने भरधाव वेगात निघालेली कार रस्त्यालगतच्या झाडावर आदळली, यात कारचा चक्काचूर झाला. प्रीती भालेराव, पूजा भोसले, सुरज मिरजे, कारचालक निशांत बागुल यांचा मृत्यू झाला. उपचारादरम्यान आज दुपारी रितेश विश्वकर्मा याचा मृत्यू झाला, गंभीर जखमी आनंद मोजाड याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात मोजाड यांच्या फिर्यादीवरून कारचालक बागुलविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.