पेन्सिलच्या टोकावर अफलातून कलाकृती, नाशिकमधील जीवन जाधवची कमाल

पेन्सिलच्या सहाय्यानं कागदावर चित्र रेखाटणारे आजवर आपण अनेक कलाकार पाहिले आहेत. परंतु एखाद्याने पेन्सिलचं शिश कोरून त्यापासून अफलातून कलाकृती साकारल्या असं तुम्हाला कुणी म्हटलं तर… वाचून आश्चर्य वाटलं ना.  नाशिकच्या जीवन जाधव या कलाकाराने ही किमया करून दाखवली आहे. त्यानं पेन्सिलचं शिश कोरून त्यापासून छत्रपती शिवाजी महाराज, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, लालबागचा राजा, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, भगवान विठ्ठल अशा शंभरहून अधिक कलाकृती साकारल्या आहेत.

आठ ते दहा तासांची मेहनत

एका कलाकृतीसाठी जीवनला आठ ते दहा तास लागतात. 4 मि.मी आणि 8 मि.मी पेन्सिलवर तो कलाकृती साकारतो. जास्त डिटेल्स असलेल्या कलाकृतींसाठी तो चपटय़ा आकाराची कारपेंटर पेन्सिल वापरतो. शिश कोरण्यासाठी तो सर्जिकल ब्लेड वापरतो. कलाकृतीसाठी जेवढी जागा हवी आहे त्या अंदाजानुसार तो आधी पेन्सिल साळून घेतो. सुरुवातीला त्यावर हायर ग्रेटच्या पेन्सिलनं कच्चे रेखाटन करतो. त्यानंतर सर्जिकल ब्लेडने हळूहळू शिसे कोरून त्यातून हवा तो आकार मिळवला जातो, अशी माहिती त्याने दिली.

पेशाने आयटी इंजिनिअर असलेल्या जीवनला लहानपणापासून चित्रकलेची आवड आहे. कलेचं कोणतंही शिक्षण न घेता तो पेन्सिलचं शिश कोरून त्यापासून अफलातून कलाकृती साकारतोय. आपल्या कलेच्या प्रवासाविषयी दैनिक ‘सामना’शी बोलताना जीवन म्हणाला, ‘‘शाळेत असताना फळ्याखाली पडलेले खडू मी जमा करायचो. रिकाम्या वेळेत ते खडू कोरून त्यापासून ग्लास, पिलर अशा नानाविध कलाकृती बनवायचो.  हाच छंद मला पुढे साईड बिझनेस मिळवून देईल याचा कधी विचारही केला नव्हता. इंजिनिअरिंगमुळे मागे पडलेला हा छंद गेल्या सात ते आठ वर्षांपासून पुन्हा जोपासायला मी सुरुवात केली. खडूऐवजी मी पेन्सिलचं शिश कोरून त्यावर विविध कलाकृती साकारू लागलो.’’ सोशल मीडियामुळे माझं ‘पेन्सिल कार्व्हिंग आर्ट’ जगभरात पोहोचलं आहे. देश-विदेशातून ऑर्डर मिळत असल्याचंही त्यानं सांगितलं.

फोकस महत्त्वाचा!

सूक्ष्म काम असल्याने या आर्टवर्कसाठी फोकस महत्त्वाचा आहे. अनेकदा शिश तुटण्याची भीतीदेखील असते. डोळ्यांची नजरही पुरत नाही असे कठीण काम असते. आजवर मी कलाकृतीसाठी एकदाही दुर्बिणीचा वापर केलेला नाही. भविष्यात आणखी डिटेल वर्क करण्यासाठी दुर्बीण वापरणार असल्याचे त्याने सांगितले.

गिनीज बुकने घेतली दखल

जीवनच्या कलाकृतीची दखल घेत आजवर त्याला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. 2019 साली त्याने एका पेन्सिलच्या शिशापासून 92 कडींची साखळी तयार केली होती. याची दखल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली आहे. या कलाकृतीसाठी त्याला शंभरहून अधिक तासांचा वेळ लागला होता. जगातील सर्वात छोटी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मूर्ती बनवण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे.

आपली प्रतिक्रिया द्या