मंदिरातला राम प्रत्येक माणसात जाईल तेव्हाच रामराज्य येईल- धनश्रीदीदी, वासंतिक नवरात्र महोत्सवास सुरुवात

dhanashree-talwalkar swadhyay pariwar

‘आज प्रत्येकाला वाटतं की रामराज्य असायला पाहिजे. पण रामराज्य येणार कसं? एका रामामुळे रामराज्य येत नाही. एका लक्ष्मणामुळे रामाला सपोर्ट मिळत नाही. त्याच्यासाठी समाज परिवर्तन झालं, संपूर्ण समाज तसा झाला, संपूर्ण समाजाची समजूत तशी व्हायला लागते त्याशिवाय रामराज्य येत नाही. मंदिरातला राम प्रत्येक माणसात जाईल तेव्हाच रामराज्य येईल’, अशा स्पष्ट शब्दात स्वाध्याय परिवाराच्या अध्वर्यु धनश्रीदीदी तळवलकर यांनी ‘राम अवताराचं मर्म’ समजावलं. गुढीपाडव्यापासून नाशिकच्या प्रसिद्ध श्री काळाराम मंदिरात वासंतिक नवरात्रोत्सवाची सुरुवात झाली. या कार्यक्रमाचं उद्घघाटन स्वाध्याय परिवाराच्या अध्वर्यु धनश्रीदीदी तळवलकर यांच्या हस्ते करण्यात आलं. ( पुढे वाचत रहा. श्री काळाराम मंदिरातील कार्यक्रमाची क्षणचित्रे सर्वात शेवटी)

वासंतिक नवरात्रोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.डी. जगमलानी, धर्मादाय आयुक्त तुफानसिंग अकाली, काळाराम मंदिर संस्थान अध्यक्ष न्यायाधीश उमेशचंद्र मोरे, यंदाचे मानकरी बुवा समीर पुजारी, मंदिर विश्वस्त धनंजय पुजारी, मंदार जानोरकर, डॉ. एकनाथ कुलकर्णी, शुभम मंत्री यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. ( पुढे वाचत रहा.)

आपल्या वक्तव्यामध्ये धनश्रीदीदी तळवलकर यांनी अत्यंत सोप्या, सहज मात्र त्याचवेळी खणखणीत शब्दात राम अवताराचं मर्म समजावलं. समाजात सुरू असलेल्या भ्रांतईश्वरवादावर देखील त्यांनी प्रहार केले. तसेच मानवपरिवर्तनाची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. ‘जोपर्यंत माणसामध्ये स्वत:मध्ये कुठल्याही प्रकारचा परिणाम होत नाही तोपर्यंत देवाला नमस्कार करून काहीही होत नाही. माणसाची समजूत माणसामधे देवत्व आणू शकते. माणसापर्यंत पोहोचायला लागतं माणसापर्यंत जायला लागतं. त्याच्याशिवाय हे घडतच नाही’, असं दीदींनी ठणकावून सांगितलं. (पुढे वाचत रहा.)

‘राम अवताराचे मर्म’ विषयावर धनश्रीदीदी तळवळकर काय बोलणार याची उत्सुकता सर्वांनाच होती. आपल्या वक्तव्याच्या सुरुवातीलाच धनश्रीदीदी यांनी अत्यंत नम्रपणे या कार्यक्रम सोहळ्याला उपस्थित राहण्याचं स्पष्ट केलं की, ‘इथे जमलेले सर्वजण हे कार्यक्रमासाठी आले असले तरी मी मात्र देवाला नमस्कार करण्यापूर्तीच आलेली आहे. देवानं जेव्हा मला बोलवलं आणि देवानं जेव्हा असा विचार केला असेल तेव्हा की आता हिच्यामध्ये मला नमस्कार करण्याची अर्हता आहे, ती इथपर्यंत येऊ शकते तेव्हाच मी इथे आले’, अशी नम्र भावना देखील दीदींनी यावेळी व्यक्त केली. ( पुढे वाचत रहा.)

अवतार का येतात? याचं कारण आपल्याला कळत नाही. मात्र श्रीमद्भगवद्गीतेत ‘परित्राणाय साधुनां… विनाशायच दुष्कृताम्… धर्मसंस्थापनार्थाय…’ या तीन कारणांसाठी मी येतो असं देवानं सांगितल्याचं त्या म्हणाल्या. (पुढे वाचत रहा.)

‘भगवान रामचंद्र हे भगवान म्हणून कधी राहिलेच नाही. त्यांच्या नावानं उदरनिर्वाह करणारे स्वत:ला देव म्हणून घेतात, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. रामांनी स्वत:ला कधी देव म्हणून घेतलं नाही. उलट त्यानं नेहमी असं म्हटलं की आत्मानं मानुषं मन्ये… मी माणूस आहे असंच म्हटलं. त्यांनी आपल्या सारखीच नाती सांभाळली. तेव्हा त्यांच्याबद्दल काय, कसं आणि कुठल्या भाषेत बोलायचं हा सगळाच संभ्रम आहे. बोलणं कठीण आहे असं नाही पण असं रामासारखं चरित्र समोर आल्यानंतर एकही शब्द सुचत नाही’, असं त्यांनी स्पष्ट केलं. (पुढे वाचत रहा.)

रामचंद्रांनी जे काम केलं त्याआधी चार पिढ्यांनी काम केलं होतं. म्हणून पाचव्या पिढीत राम आले. जादूच्या कांडीने रामराज्य आलं नाही, असं सांगत त्यांनी रामराज्यासाठी पिढ्यांचे परिश्रम आणि भगीरथ प्रयत्नांचं महत्त्व विशद केलं. ( पुढे वाचत रहा.)

आपल्या विषयात श्री काळाराम मंदिरातील मूर्तीचं वैशिष्ट्य दीदींनी अत्यंत सुंदर शब्दात समजावलं. मंदिरातील राम मूर्तीचा उजवा हात हृदयाजवळ आहे. त्याचा अर्थ दीदींनी समजावला की माझं स्थान सर्वांच्या हृदयात आहे. तेव्हा संपूर्ण परिसरात टाळ्यांचा कडकडाट झाला. ( पुढे वाचत रहा.)

आपण केवळ इतिहासात रमणारी लोकं असल्याचं सांगत त्या म्हणाल्या की रामाचं वास्तव्य हे केवळ पंचवटीच्या परिसरातच आहे असं नाही. तो प्रत्येक माणसाच्या आत आहे. त्यांच्याशिवाय मानव जगूच शकत नाही. राम माझ्यात सोबत असणं अत्यंत आवश्यक आहे. पण राम माझ्यासोबत आहे हे ओळखणं हे त्याच्याहून आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं. ( पुढे वाचत रहा.)

असा एक समाज होता जो विविध गुणांनी संपन्न होता. मातापित्याविषयी अत्यंत प्रेम आदर, भावंडांमध्ये प्रेम, आचार्यांविषयी प्रेम अशा समाजाला रामा सारखा राजा मिळाला. त्यासमाजाला रामाने शिक्षण व्यवस्था दिली, राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था, शासनव्यवस्था दिली, असं त्या म्हणाल्या. आज तपोवन शिक्षण पद्धतीच्या श्रेष्ठतेचं गुणगान गायलं जातं. तसं शिक्षण देण्याविषयी बोललं जातं. मात्र असं बोलणारे लोक त्यांच्या स्वत:च्या मुलांना अशा तपोवनात पाठवतात का? असा खणखणीत सवाल त्यांनी विचारला. ( पुढे वाचत रहा.)

माणसानं माणूस बनावं अशी आमची अपेक्षा असेल तर माणूस एकाएकी तसा बनू शकत नाही. त्यासाठी आपण प्रयत्न करतो का? मुलाला त्याच्या जन्मापासून त्याच्या युवावस्थेपासून विशिष्ट प्रकारची दिशा ही दिली गेली पाहिजे तर हे होणार. रामराज्य येण्यासाठी परिश्रम पाहिजे, असं त्यांनी सांगितलं. रामराज्य ही वसिष्ठांची प्रयोगशाळा आहे, असंही त्या म्हणाल्या. ( पुढे वाचत रहा.)

आज आपला समाज असा का झाला याविषयी त्या म्हणाल्या की, ‘आपल्याला परिश्रम घ्यायचेच नाहीत. मग आपण सोपारस्ता घेतो. ज्यात परिश्रम घ्यावे लागतील, बुद्धी चालवावी लागेल असा रस्ता आपण घेतचं नाही. कारण आम्हाला ते नकोच आहे. मग समाजच आपण तसा निर्माण करतो.’ ( पुढे वाचत रहा.)

भक्ताच्या व्याख्याच बाह्य गोष्टींवर आधारित झाल्याची टीका त्यांनी यावेळी केली. भक्ती आणि भक्ताविषयीच्या आताच्या कल्पनांवर त्यांनी कडक शब्दात हल्ला चढवला. आज गृहस्थाश्रम न स्वीकारता, लग्न न करता राहणाऱ्यांना, भक्त समजलं जातं, अशा प्रकारच्या भ्रामक कल्पनांना त्यांनी छेद दिला. ( पुढे वाचत रहा.)

गृहस्थाश्रमाचं महत्त्व समजावताना त्या म्हणाल्या की, जीवनात येणारा छोट्यातला छोटा संघर्ष हे जीवनाला ट्रेनिंग आहे. संघर्ष म्हणजे केवळ युद्ध करायची असं नाही. तर दोन माणसांनी एका विचाराचं होऊन एकत्र येऊन संसार करायचा हा मोठ्यातला मोठा संघर्ष आहे. जर आपण घरात एक होऊ शकत नाही, एकत्र राहू शकत नसू तर आपल्यात, देशात, समाजात एकत्व कसं येणार? दुसरा माणूसच जर चालत नाही तर मग कसं चालणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ( पुढे वाचत रहा.)

रामचंद्रांनी वनवास का स्वीकारला? हे सांगताना त्या म्हणाल्या, ‘रामांनी ‘नर वा नर’ अशा स्थितीत जगणाऱ्या लोकांमध्ये जाऊन त्यांना समजावलं. सामान्यातील सामन्यांपर्यंत ते विचार घेऊन गेले.’ ( पुढे वाचत रहा.)

समाज महत्त्वाचा की मी?

मानव शरीर धारण केल्यावर माणसांशी कसं वागावं याची उत्तम उदाहरणं राम आणि कृष्णांनी दिली. दुसऱ्या सोबत रहावं लागतं, दुसऱ्याला समजून घ्यायला लागतं. दुसऱ्याचं ऐकायला लागतं. समाज महत्त्वाचा की मी महत्त्वाचा तेव्हा समाज महत्त्वाचा, मी नाही हे लक्षात आलं पाहिजे, असं त्या म्हणाल्या. ( पुढे वाचत रहा.)

माणूस लोकांची मनं कशी जिंकू शकेल?

राम लोकांची मनं कशी जिंकू शकले याचं मर्म सांगताना दीदी म्हणाल्या की, ‘रामचंद्रांना वनवासात जायचं असं समजलं तेव्हा रामाला अनेकांनी सांगितलं की आम्ही तुझ्यासोबत आहोत. तू राज्य कर, पण रामचंद्र ठाम होते. रामांनी सगळ्यांची मनं जिंकली होती. माणूस जेव्हा इतक्या लोकांची मन जिंकतो, तेव्हाच माणूस लोकांच्या जीवनावर अधिराज्य करू शकतो. आणि लोकांची मनं जिंकण्यासाठी स्वत:ला पुष्कळ गोष्टी सोडाव्या लागतात. ( पुढे वाचत रहा.)

आज न्युक्लिअर फॅमिली भाषा, पण एकत्र का नाही राहू शकत?

आज प्रत्येक ठिकाणी न्युक्लिअर फॅमिलीची भाषा बोलली जात आहे. एका बाजूला रामचंद्राबद्दल बोलायचं आणि स्वत: एकत्र कुटुंबात राहायचं नाही, असा विरोधाभास दीदींनी यावेळी अधोरेखित केला. ( पुढे वाचत रहा.)

रामचंद्रांवरील आधुनिकांच्या आरोपांचं खंडन

रामचंद्रांनी सीतेला वाल्मीकींच्या आश्रमात का पाठवलं असे आरोप केले जातात. त्याचं खंडन दीदींनी केलं. प्रत्येक माणसाच्या वेगवेगळ्या भूमिका असतात. राम केवळ सीतेचे पती नव्हते ते राजा होते. त्यामुळे राज्यासाठी त्यांना तशी भूमिका घ्यावी लागली. त्यात रामचंद्रांचा दोष नव्हता. सीतामातेने कधीही रामचंद्रांना दोष दिलेला नाही. सीतेनं रामाच्या भूमिका स्वीकारलेल्या होत्या, असं दीदींनी सांगितलं. ( पुढे वाचत रहा.)

नातेसंबंध जपले नाही तर…

राम आणि सीतेचे एकमेकांवर आत्यंतिक प्रेम होते. असं प्रेम आज न्युक्लिअर होत चाललेल्या फॅमिलित दिसत नाही. राम आणि सीतेने सर्व नातेसंबंध जोपासले होते. आज नातेसंबंध जोपासले जात नाहीत. संसार करताना प्रत्येकाच्या विविध भूमिका आहेत. एखाद्या महिलेचा नवरा जरी असला तरी तो त्याचवेळी तो कुणाचा मुलगाही आहे, भाऊ आहे, मित्र आहे, त्याला कुणी बहीणही आहे, ही सगळी नाती सांभाळावी लागतात. अशी नाती सांभळली जात नसल्यानं भविष्यात सुशिक्षित अविवाहित स्त्री असं चित्र पाहायला मिळण्याची शक्यता दीदींनी व्यक्त केली. जोपर्यंत आपण बदलत नाही, आपली दृष्टी बदलत नाही तोपर्यंत आपण असेच राहणार. स्त्री आणि पुरुष दोघांनीही एकमेकांच्या भूमिका समजून घेतल्या पाहिजे, असंही दीदींनी ठणकावून सांगितलं. ( पुढे वाचत रहा.)

तत्त्व हेच रामचंद्रांचं सत्त्व!

रामनवमीच्या केवळ उपासाने रामराज्य येणार नाही. उपासातील श्रद्धा परंपरेचा भाग मान्य, पण त्यातून रामराज्य येणार काय? त्यासाठी मेहनत घ्यावी लागेल. रामचंद्र तत्त्वासाठी जगले. त्यांच्या जीवनातील तत्त्व हेच सत्त्व होतं, असं दीदींनी समजावलं. ( पुढे वाचत रहा.)

नास्तिकांनाही रामराज्य हवं!

नास्तिकांना देव नको, देव मान्य नाही. पण त्यांनाही रामराज्य हवं आहे, असं दीदींनी अधोरेखित केलं. ( पुढे वाचत रहा.)

नेता कसा पाहिजे रामा सारखा!

राम राजा होते. नेता कसा पाहिजे, प्रजेच्या उत्थानासाठी पाहिजे, प्रजेच्या भल्यासाठी पाहिजे. समाजाला काय पाहिजे शाश्वत मार्गदर्शन करण्यासाठी पाहिजे, असं त्यांनी सांगितलं. ( पुढे वाचत रहा.)

राम चरित्रातील आणि रामायणातील सूक्ष्म गोष्टींवर दीदींनी टाकलेला प्रकाश…

1. रामाने स्वत:मध्ये देवत्व उभं केलं!

रामामध्ये देवत्व रामाने स्वत: आणलं. रामाने स्वत:मध्ये देवत्व उभं केलं की ज्याच्यामुळे आपण सर्व त्यांना देव मानायला लागलो. नरामधून नारायणापर्यंतची जी गती आहे ती गती काढून टाकली.

2. रामायणामध्येसुद्धा रामचंद्र असा उल्लेख एक किंवा दोनदाच!

सबंध वाल्मिकी रामायणामध्येसुद्धा रामचंद्र असा उल्लेख एकदा किंवा दोनदाच आहे. अख्या रामायणात त्यांचा उल्लेख राम म्हणूनच आहे. राम, लक्ष्मण, सीता असेच उल्लेख आहेत. लक्ष्मणाचा त्यांच्याप्रती असलेला भाव व्यक्त करताना एका ठिकाणी रामचंद्र असा उल्लेख केला आहे.

3. रामांच्याबद्दल स्थितप्रज्ञ हे विशेषण नाही!

राम स्थितप्रज्ञ होते पण रामांच्याबद्दल स्थितप्रज्ञ हे विशेषण नाही कधीही वापरण्यात आलेले नाही. कारण मानवातले नवं रस, भाव त्यांच्या जीवनात पाहायला मिळतात. आईवडिलांबद्दलचा आदर, भावांबद्दलचा आदर, पत्नीबद्दलचं प्रेम, गुरूच्या बद्दलचा आदर असे सगळ्या संबंधांबद्दलचे महत्त्व आपण जसं ठेवलं पाहिजे तसंच त्यांनी त्यांच्या आयुष्यात ठेवल्याचं दीदी म्हणाल्या.

4. दशरथ रामांबद्दल बोलतात की राम हा दोनदा बोलत नाही. दीदी म्हणाल्या की त्याचा अर्थ असा आहे की राम एकदा बोलतो ते करतो, दोनदा बोलत नाही. एकदा बोलतो ते करतो. हे रामाचं वडिलांनी केलेलं कौतुक आहे.

5. दशरथ मात्र इतके भाववश होतात की अनेकांना अनेक शब्द दिले. पण त्यांचं पालन रामचंद्रांनी केलं आहे.

स्वाध्यायींची शिस्त

या कार्यक्रमाच्यावेळी जवळपास दोन हजार स्वाध्यायी उपस्थित होते. स्वाध्यायी स्वत:च्यासोबत पाण्याची बाटली, चपला सोबत ठेवण्यासाठी कापडी पिशव्या सोबत घेऊन आले होते. दीड तास चाललेल्या कार्यक्रमावेळी अत्यंत शांतता होती. मंदिरात दर्शनाची रांगही व्यवस्थित सुरू होती. गाड्यांचे पार्किंग व्यवस्था आरपी विद्यालयात केली होती. रस्ते असो वा मंदिर परिसर एवढा मोठा कार्यक्रम असताना पोलिसांची वर्दळ नव्हती. जागोजागी केवळ स्वाध्यायी कृतिशील उभे दिसत होते. स्वाध्यायींच्या शिस्तीतच संपूर्ण कार्यक्रम उत्तम रित्यापार पडला.

श्री काळाराम मंदिरातील कार्यक्रमाची क्षणचित्रे

सर्व फोटो: भूषण अहिरराव

————————————— समाप्त————————————-