नाशिक, मालेगावातील परिस्थिती नियंत्रणात – जिल्हाधिकारी सूरज मांढरे

1278

>> बाबासाहेब गायकवाड

हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावसह संपूर्ण नाशिक जिल्ह्यात कोरोनाची स्थिती नियंत्रणात आहे. रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ऐंशी टक्के आहे. यामुळे या रोगावर मात करून जिल्हा लवकरच कोरोनामुक्त होईल, असा विश्वास नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी व्यक्त केला.

जिल्ह्यात पहिला रूग्ण २२ मार्चला आढळून आला. तेव्हापासून आता २२ मेपर्यंत दोन महिन्याच्या काळात परिस्थिती नियंत्रणात आली आहे. मालेगाव मध्यला लागून असलेले दाभाडी गाव पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहे. मालेगावपाठोपाठ ग्रामीण भागात येवल्यात रूग्ण होते, आता हे शहरही कोरोनामुक्त झाले आहे. नाशिक शहरातही रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे. दीडशे पोलिसांपैकी ९६ पोलीस बरे होवून घरी गेले आहेत. मालेगावमध्ये साडेसहाशेपैकी पाचशे रूग्ण बरे झाले आहेत. संपूर्ण जिल्ह्याची आकडेवारी पाहता आठशेपैकी सहाशे रूग्ण बरे झाले आहेत. रूग्णांनी वेळेवर उपचार घेतल्याने हे शक्य झाले आहे. कोरोनाची थोडीशी लक्षणे जाणवल्याबरोबर नागरिकांनी तपासणी करून घ्यावी, वेळेवर उपचार मिळतील आणि जिवावरचे संकट टळेल, असे मांढरे यांनी सांगितले.

नाशिककरांनी सजगता बाळगली

नाशिक जिल्ह्यात सुरुवातीपासूनच सजगता बाळगली गेली. पालकमंत्री छगन भुजबळ, कृषीमंत्री दादा भुसे यांनी वेळोवेळी परिस्थितीचा आढावा घेतला. लोकप्रतिनिधी आणि पोलीस, प्रशासन यांचा चांगला समन्वय आणि नागरिकांनी दाखविलेली सजगता यामुळे परिस्थिती नियंत्रणात राहिली. एकमेकातील सुरक्षित अंतर, मास्क वापरणे, हॅण्डवॉशसह वैयक्तिक स्वच्छतेकडे नागरिकांनी लक्ष दिल्याने, नियमांचे पालन केल्याने संशयित रूग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे.

मुख्यमंत्र्यांचे विशेष लक्ष

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांचे नाशिक जिल्ह्यासह मालेगावकडे विशेष लक्ष आहे. त्यांनी वेळोवेळी आढावा घेवून सूचना दिल्या. सोयीसुविधांबाबत माहिती घेवून त्या पुरविल्या. आरोग्यमंत्री राजेश टोपे हे नेहमीच आढावा घेत असतात, त्यांनी नाशिक, मालेगावचे प्रत्यक्ष दौरे करून परिस्थिती जाणून घेतली. एकूणच शासनाचे यंत्रणेला पूर्णपणे पाठबळ मिळाले, असेही जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी स्पष्ट केले.

मालेगावात सर्व सोयीसुविधा

मालेगावमध्ये आता रूग्णसंख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. मालेगाव मध्य भागातही संशयित मोठ्या प्रमाणावर तपासणीसाठी पुढे येत आहे, औषधोपचारही घेत आहेत. यामुळे येथे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. डिजिटल एक्स-रे मशीनची सुविधा उपलब्ध केल्याने आता स्वॅब घेण्याची आवश्यकता पडत नाही. मी स्वत: सतत मालेगावी जावून प्रत्यक्ष उपाययोजनांची माहिती घेतो. तेथील इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरचे प्रमुख डॉ. पंकज आशिया, महापालिका आयुक्त दीपक कासार, डॉ. निखील सैंदाणे, डॉ. गोविंद चौधरी आदी सर्वच अधिकारी, मालेगावातील डॉक्टर, युनानी डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉय, पोलीस यंत्रणा असे सर्वांचेच चांगले टिमवर्क असल्याने येथे परिस्थिती नियंत्रणात आहे. येथे व्हेंटिलेटरसह सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत. रुग्णांना उपचारासाठी, क्वॉरंटाईनसाठी शाळांसह इतर इमारती, तसेच हज हाऊसही ताब्यात घेतले आहे. सध्या एकाचवेळी दीड हजार रुग्णांवर उपचार करता येवू शकतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. वेळप्रसंगी ही क्षमता वाढविण्याची सुद्धा पूर्वतयारी आहे. पण, ही वेळ येणार नाही, असे मांढरे यांनी स्पष्ट केले.

ग्रामीण भागात बससेवा सुरू होणार

नाशिक आणि मालेगाव महापालिका क्षेत्र वगळता ग्रामीण भागात तालुक्याच्या ठिकाणी व तालुकाअंतर्गत गावांसाठी एसटी बससेवा लगेचच सुरू होईल, त्याचे नियोजन एस.टी. महामंडळाचे संबंधित अधिकारी करतील, असे ते म्हणाले.

साथ नियंत्रणाला प्रथम प्राधान्य

अर्थचक्राला वेग यावा यासाठी उद्योग-व्यवसाय सुरू करण्याला परवानगी देण्यात आली आहे. मात्र, साथ नियंत्रणाला प्रथम प्राधान्य आहे. कुठल्याही आस्थापनेत अतिगर्दी झाली अन् नियमांचे उल्लंघन झाले तर ती आस्थापना त्वरित बंद करण्यात येईल. पन्नास व्यक्तींच्या हजेरीत घरच्या घरी विवाह सोहळा करता येईल. घरात जागा नसेल तर घरासमोरील जागेत हा सोहळा संबंधित पोलीस ठाण्याच्या परवानगीने घेता येईल.

जमीन मोजणीला परवानगी

मालमत्ता खरेदी-विक्रीसाठी उपनिबंधक कार्यालयातील दस्त नोंदणीला परवानगी देण्यात आली आहे. याच्याशी संबंधित असलेले शेतजमीन व भूखंडांच्या मोजणीलाही परवानगी आहे, तसे आदेश भूमी अभिलेखला देणार असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले. कंटेन्मेंट झोनमध्ये मात्र मोजणीची कार्यवाही करता येणार नाही.

आपली प्रतिक्रिया द्या