नाशिक : एकाच कुटुंबातील चौघांच्या हत्येने नांदगाव तालुका हादरला; मृतांमध्ये दोन लहानग्यांचा समावेश

1260

नांदगाव तालुक्यातील जेऊर शिवारात एकाच कुटुंबातील चौघांची अज्ञातांनी निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी उघड झाली. याप्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून, मारेकऱ्यांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.

नांदगाव तालुक्यातील वाखरी येथील अॅपे रिक्षा चालक समाधान अण्णा चव्हाण (35) यांचे जेऊर शिवारात शेतात घर आहे. ते गुरुवारी रात्री पत्नी भारती (26), मुलगी आराध्या (7), मुलगा अनिरुद्ध (5) यांच्यासह ओट्यावरील खाटेवर झोपले होते. रात्रीच्या सुमारास अज्ञातांनी धारदार शस्त्राने त्यांची मान, डोके व हातावर वार करून हत्या केली, ही घटना सकाळी ग्रामस्थांच्या लक्षात आली.

घटनेची माहिती मिळताच नांदगाव व मालेगाव तालुका पोलिस ठाण्यातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. श्वान पथकाच्या सहाय्याने मारेकऱ्यांचा माग काढण्याचा प्रयत्न झाला. संशयितांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत, अशी माहिती मालेगाव तालुका पोलीसांनी दिली.

समाधान यांचे वडील अण्णा पुंजाराम चव्हाण हे काही दिवसांपूर्वी जावयाचा अपघात झाल्याने मुलीकडे राहण्यासाठी गेले होते. शेजाऱ्यांनी कळवताच ते आज गावी आले. त्यांच्या फिर्यादीवरून मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या