अनुसूचित क्षेत्रातील पेसा 17 संवर्गाची कायमस्वरुपी पदभरती तत्काळ करावी, या मागणीसाठी कृती समितीने आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांना भेटण्यासाठी गेलेल्या माजी केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार, आमदार देवयानी फरांदे, आमदार सरोज आहिरे यांना आंदोलकांनी घेराव घातला. इतके दिवस कुठे होता, असा जाब विचारीत धारेवर धरून परत पाठवले. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको करण्यात आला.
कृषी सेवक, उपवनसंरक्षक, तलाठी, आरोग्य सेवक आदी पदांची भरती प्रक्रिया पार पडली असतानाही अनुसूचित जमातीतील पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली नाही, ती त्वरित द्यावी, यासह पेसा 17 संवर्ग पदभरतीच्या प्रक्रिया पार पाडाव्यात आदी मागण्या कृती समितीच्या वतीने करण्यात आल्या आहेत. त्या मान्य होण्यासाठी कृती समितीच्या वतीने एक ऑगस्टपासून ईदगाह मैदानावर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. सोमवारी या आंदोलकांची भेट घेण्यासाठी माजी केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार, भाजपा आमदार देवयानी फरांदे, अजित पवार गटाच्या आमदार सरोज आहिरे या गेल्या. आंदोलनस्थळी हे लोकप्रतिनिधी जाताच आंदोलकांनी त्यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरू केली. इतके दिवस काय करीत होता, सत्तेत असतानाही न्याय का देत नाही, असे खडेबोल सूनावले. काही वेळ घेराव घातला. या सर्व लोकप्रतिनिधींची भाषणेही आंदोलकांनी बंद पाडली. गो बॅक म्हणत घोषणाबाजी करीत या माजी मंत्री, आमदारांना परत पाठविले. यानंतर माकपाचे माजी आमदार जिवा पांडू गावीत, काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांनी आंदोलकांशी चर्चा केली.
शिष्टमंडळासह जिल्हाधिकार्यांची भेट घेण्यासाठी ते गेले असता आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको केला. साडेचार वाजेपासून सायंकाळी पावणेसहा वाजेपर्यंत असे सवातास चाललेल्या या आंदोलनाने मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
आदिवासी विकास कार्यालयासमोर ठिय्या
खासदार भास्कर भगरे, माजी आमदार जिवा पांडू गावीत, आमदार हिरामण खोसकर यांनी जिल्हाधिकार्यांशी चर्चा केली. यानंतर त्यांच्यासह आमदार नरहरी झिरवाळ यांनी आदिवासी विकास आयुक्त नयना गुंडे यांच्याशी या प्रश्नासंदर्भात चर्चा केली. आंदोलकांनीही आयुक्त कार्यालयावर धडक दिली, गडकरी चौकातील महामार्गावर ठिय्या आंदोलन केले.