पेठच्या ‘त्या’ बालगृहातील ५८ मुली नाशिकच्या अनुरक्षण गृहात

54

सामना प्रतिनिधी । नाशिक

पेठच्या कापुरझिरापाडा येथील आदिवासी महिला हक्क संरक्षण समितीच्या बालगृहातील एका अनाथ मुलीवर बलात्कार करणारा अतुल अलबाड व त्याला साथ देणारी त्याची आई, संस्थेची अध्यक्षा सुशीला अलबाड हे दोघे पोलीस कोठडीत आहेत. धाबे दणाणलेल्या महिला बालविकासच्या प्रशासनाने त्या बालगृहातून आज ५८ मुलींना सुरक्षितता म्हणून नाशिकच्या अनुरक्षण गृहात आणले.

बलात्काराचे प्रकरण आठ दिवस दडपवून संस्था अध्यक्षांना पाठीशी घालणारे महिला व बालविकासचे उपायुक्त बी. टी. पोखरकर यांना गुन्हा दाखल झाल्यानंतर चार दिवसांनी खडबडून जाग आली. आज गुरुवारी सकाळीच त्यांनी अधिकाऱयांसह बालगृह गाठले व मुलींना सायंकाळी पाचच्या सुमारास नाशिकमध्ये आणले. महिला बालकल्याण समितीच्या आदेशाने या सर्व मुलींना जिह्यातील अन्य बालगृहात, तसेच नाशिकमध्ये शिक्षणाची व राहण्याची कायमस्वरुपी व्यवस्था करण्यात येणार आहे.

जादा अनुदान लाटले

या संस्थेच्या एकाच आवारात दोन बालगृह आहेत, त्यांची एकूण क्षमता १३० मुलींची आहे. आज मात्र प्रत्यक्षात ५८ मुली अनुरक्षण गृहात आणण्यात आल्या. अध्यक्षांनी दिलेल्या खोटय़ा रेकॉर्डनुसार महिला बालविकास विभागामार्फत शंभरहून अधिक मुलींचे शासकीय अनुदान दिले जात होते. खोटी संख्या दाखवून शासनाची लूट केल्याचे यावरून स्पष्ट होते.

विशेष अधिकारी नियुक्त करणार

संस्थेचे कुठलेही रेकॉर्ड पूर्ण नाही, भ्रष्ट व अनागोंदी कारभाराला बालविकास विभागानेच पाठीशी घातले आहे. येथील भ्रष्ट अधिकाऱयांना बाजूला ठेवून विशेष वरिष्ठ अधिकाऱयामार्फत या कारभाराची चौकशी केली जाईल, असे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी सांगितले.

‘त्या’ मुलीच्या मृत्यूचे गूढ वाढले

बालगृहातील एका अल्पवयीन मुलीचा सन २०१६मध्ये पाण्यात बुडून संशयास्पद मृत्यू झाला होता. ही मुलगी पाण्यात बुडाली की घातपात झाला, याचे गूढ आता वाढले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या