बॉम्ब शोधण्यात तरबेज ‘स्निफर स्पाईक’ला नाशिक पोलिसांचा अनोखा निरोप

नाशिक पोलिसांसाठी बॉम्ब शोधण्यात तरबजे असलेला, गेली 11 वर्षे इमानेइतबारे देशसेवा करणाऱया स्नीफर स्पाईक श्वानाला पोलिसांनी अनोखा निरोप दिला. जणू काही कुटुंबातील एक सदस्य निवृत्त झालाय या भावनेतून पोलिसांनी प्रिय साथीदाराला सन्मानाने सेवानिवृत्त केले. फुले आणि फुग्यांनी सजवलेल्या पोलीस वाहनाच्या बोनेटवर बसवून स्पाईकची छोटेखानी मिरवणूक काढली आणि त्याला कडक सॅल्युट केला. त्याच्या वाढदिवसानिमित्त केकही कापण्यात आला.


नाशिक बॉम्बशोधक- नाशक पथकात 2010 साली तीन महिन्यांचे लॅब्रोडोर जातीचे प्रशिक्षित श्वान दाखल झाले होते. स्पाईकचे वयोमान आणि सेवाकालावधी लक्षात घेता मंगळवारी त्याला पोलीस सेवेतून निवृत्त करण्यात आले. 2013-14 साली एका व्यापारी संकुलात अज्ञाताने ठेवलेला पेट्रोल बॉम्ब याच स्पाईकने शोधून काढला होता. कार्यकाळात स्पाईकने महत्त्वाची कामगिरी बजावली. 2015-16 साली नाशकात झालेल्या कुंभमेळ्याप्रसंगी सुरक्षिततेच्यादृष्टीने रामकुंड, तपोवन, साधुग्राम या भागात पोलीस कर्मचाऱयांसह अहोरात्र काम केले. रेल्वेस्थानके असू दे किंवा अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या दौऱयात स्पाईकने परिसर पिंजून काढलेला आहे. काळाराम मंदिर असू दे किंवा अन्य महत्त्वाच्या ठिकाणी पोलिस पथकासह रुबाबात दिसणारा स्पाईक म्हणजे सर्वांच्या कौतुकाचा विषय असायचा.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करून आज श्वानाला सलाम केला आहे. लॅब्रोडोर स्पाईकला पुढील संगोपनासाठी मागील दहा वर्षांपासून त्याचा सांभाळ करणारे श्वान हस्तक पोलीस गणेश हिरे यांना सोपवण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या