नाशिक : देशात प्रथमच सीड पेपरपासून आकर्षक राख्यांची निर्मिती; तुळस, झेंडूची रोपे बहरणार

501

>> प्रज्ञा सदावर्ते

देशात यंदा प्रथमच सीड पेपरपासून नाशिकच्या सावी बचत गटाच्या महिलांनी शेकडो आकर्षक आणि पर्यावरणपूरक राख्या तयार केल्या आहेत. यात पेपर क्विलींगचा सुंदर आविष्कार बघावयास मिळतो. या पेपरमध्ये तुळस व झेंडूचे बी असल्याने मातीत मिसळल्यानंतर रोप बहरेल, त्यामुळे राख्या रोपट्याच्या रूपात कायम सोबत राहतील. या गटाने सुमारे साडेबारा हजार राख्या साकारल्या असून, महाराष्ट्रासह इतर राज्यातही त्यांची विक्री झाली आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन असताना सामान्य कुटुंबातील या महिला कलेच्या माध्यमातून स्वावलंबनाचा मार्ग निवडून आर्थिकदृष्ट्याही कुटुंबाचा आधार झाल्या.

समृद्धी बहुउद्देशीय संस्थेअंतर्गत सावी बचत गट काम करतो. यातील महिला पेपर क्विलींगच्या माध्यमातून राख्या तयार करतात. समृद्धीच्या सचिव डॉ. कविता बोंडे यांनी सीड पेपरपासून पर्यावरणपूरक राख्या साकारण्याची कल्पना या गटाला दिली. गटाच्या अध्यक्षा मनीषा बडगुजर, सायली गवांदे, मानसी पाटील, गौरी परदेशी आदींनी ही कल्पना प्रत्यक्षात उतरविली. आणखी 67 महिलांना यातून रोजगार मिळाला. स्वच्छतेचे आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून या महिलांनी तीन महिन्यात पानाफुलांच्या, लहान मुलांसाठी कार्टूनच्या राख्या, तसेच छोटे आकर्षक बॉक्स तयार केले. डॉ. कविता बोंडे, डॉ. सुजाता धारणकर, डॉ. ज्योती पाटील यांनी गटाला साहित्यासोबतच बाजारपेठही मिळवून दिली. त्यांनी साडेबारा हजार राख्या तयार केल्या, त्यांची किंमत 15 ते 140 रुपयांपर्यंत आहे. मुंबई, पुणे, नागपूर, संभाजीनगर, जळगावसह जयपूर, चेन्नईला राख्यांची विक्री झाली. आर्थिक संकटाच्या काळात या महिलांनी कलात्मकतेच्या माध्यमातून प्लॅस्टिकमुक्ती आणि पर्यावरण संवर्धनाचे भान जपले आहे.

कोरोना योद्ध्यांना भेट

seed-papers-used-for-rakhi

कोरोना संकटकाळात दिवसरात्र सेवा देणार्‍या डॉक्टर, पोलीस, आरोग्य कर्मचार्‍यांप्रती या गटाने कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी नाशिक शहरातील सुमारे साडेतीन हजार कोरोना योद्ध्यांना राख्या भेट दिल्या आहेत.

 पेपर क्विलींगचा आविष्कार

पेपर क्विलींगची कला अवगत असणार्‍या या गटातील महिलांनी राख्यांचे विविध प्रकारचे डिझाईन तयार केले. इतर महिलांची मदत घेवून आकर्षक राख्या साकारल्या आहेत.

स्वावलंबन साध्य

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मध्यमवर्गीय कुटुंब आर्थिक संकटात सापडले. या महिलांच्या हातात कला आहे, त्यातून त्यांना रोजगार मिळावा हा प्रयत्न होता. त्यांना आर्थिक कमाईचा मार्ग मिळाला याचा आनंद आहे, असे डॉ. कविता बोंडे म्हणाल्या.

आपली प्रतिक्रिया द्या