सिन्नरला ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार; सरस्वती नदीला पूर,घरांमध्ये पाणी शिरले

नागरिकांना जेसीबीच्या मदतीने बाहेर काढले 

सिन्नर शहरासह तालुक्यातील डुबेरे, कोनांबे येथे गुरुवारी सायंकाळी ढगफुटीसदृश पावसाने हाहाःकार उडाला. पन्नास वर्षात प्रथमच सरस्वती नदीला मोठा पूर आल्याने परिसरातील घरांमध्ये पाणी शिरले, अनेकांचे संसार उघडय़ावर आले. अनेक वाहने वाहून गेली. पुराचे पाणी वाढत गेल्याने रात्री येथील नागरिकांना जेसीबीच्या मदतीने, तर दुकानांमध्ये अडकलेल्या पंधरा व्यापाऱयांना पोलीस व अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले. प्रशासन मदतीसाठी लवकर आले नाही म्हणून संतप्त नागरिकांनी आज नाशिक-पुणे महामार्ग रोखून धरला होता.

सरस्वती नदीला आलेल्या महापुराचे पाणी जवळील ऐश्वर्या झोपडपट्टी व अपना गॅरेज भागातील घरांमध्ये घुसले. यामुळे अनेक घरे उद्ध्वस्त झाली. दुकानांमध्ये दहा ते पंधरा व्यापारी अडकून पडले. पोलीस व अग्निशमन दलाने त्यांना सुखरूप बाहेर काढले. माजी आमदार राजाभाऊ वाजे, माजी नगराध्यक्ष किरण डगळे, विजय जाधव, वासंती देशमुख आदींसह अनेकजण मदतीसाठी धावून आले. स्वयंस्फूर्तीने नागरिकांनी पूरग्रस्तांसाठी जेवणाची व्यवस्था केली. प्रशासनानेही पावले उचलत नागरिकांना लॉन्समध्ये स्थलांतरीत केले. 

पूरग्रस्तांना मदत करा 

नागरिक, व्यावसायिक, भाजी विक्रेते, फेरीवाले यांचे महापुरामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. सर्व सिन्नरवासीयांनी या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी पुढे यावे. गणेशोत्सव मंडळांनी उत्सव काळातील अवांतर खर्च टाळून मदतीचा हात द्यावा. ही मदत मातोश्री नर्मदा लॉन्स येथे जमा करावी, असे कळकळीचे आवाहन शिवसेनेचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी केले आहे.

पिकांचे मोठे नुकसान 

तालुक्यातील कोनांबे शिवारात पावसाने शेतीपिके उद्ध्वस्त झाली. सर्वात मोठा फटका टोमॅटो व सोयाबीन पिकाला बसला आहे. दापूर, नांदूरशिंगोटे, पांढुर्ली, दोडी, चापडगाव, सोनेवाडी, माळवाडी, गोंदे, मरळ, मानोरी, निराळे, कणकोरी या भागात शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. 

विक्रमी 165 मिमी पाउस

सिन्नरमध्ये अवघ्या दोन-अडीच तासात तब्बल 165 मिलिमीटर इतका पाऊस पडला. डुबेरेत 110 मिलिमीटर, पांढुर्लीत 62, नांदूरशिंगोटेत 48, तर देवपूरला 42.5 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.